बळीराजा कसा उभा रहाणार? कारखान्यांकडे थकबाकीचा डोंगर 

तात्या लांडगे 
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

सोलापुरातील कारखान्यांकडे 95 कोटी थकले 
साखर आयुक्‍तालयाच्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यातील संत दामाजी, दि सासवड माळी शुगर, लोकमंगल ऍग्रो, लोकमंगल शुगर, विठ्ठल कार्पोरेशन, जकराया, भैरवनाथ- 2 विहाळ, फॅबटेक, युटोपियन व जयहिंद या 10 साखर कारखान्यांकडे यंदाच्या गाळप हंगातातील 94 कोटी 83 लाखांची एफआरपी थकली आहे. तर राज्यातील 97 कारखान्यांनी अद्याप 735 कोटी 93 लाखांची एफआरपी अद्याप शेतकऱ्यांना दिली नसल्याचे 31 डिसेंबरच्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील 10 साखर कारखान्यांसह राज्यातील 97 साखर कारखान्यांकडे यंदाच्या गाळप हंगामातील 735 कोटी 93 लाखांची एफआरपी थकलेली आहे. 143 पैकी आतापर्यंत औरंगाबाद व नगर जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांचे गाळप बंद झाले आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत 245 लाख टन उसाचे गाळप झाले असून त्यातून 255 लाख टन साखर उत्पादित झाली आहे. कारखानदारीसमोरील अडचणी मांडण्यासाठी कारखानदार नव्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. 

हेही वाचा - धक्कादायक... एसटीच्या वाढत्या तोट्यामुळे भरती रखडली 

मागच्या वर्षीचा दुष्काळ अन्‌ यावर्षी सांगली, कोल्हापूर, सोलापूरसह राज्यातील अन्य जिल्ह्यांना बसलेला महापुराचा फटका, यामुळे यंदा तब्बल 452 लाख टनाने उसाचे गाळप घटणार असल्याचे साखर आयुक्‍तालयाकडून सांगण्यात आले. राज्यातील 143 साखर कारखान्यांनी यंदा गाळप सुरु केले मात्र, कारखाना परिसरात मुबलक ऊस उपलब्ध नसल्याने अनेक कारखान्यांसमोर अडचणी निर्माण झाल्याचे चित्र आहे. या गाळप हंगामात एकूण 500 लाख टन उसाचे गाळप होईल, असा अंदाज आयुक्‍तालयाने वर्तविला आहे. आणखी दीड महिना गाळप हंगाम सुरु राहील, असे चित्र आहे. मागच्या वर्षी राज्यात 952 लाख टन उसाचे गाळप झाले होते. या वर्षी साखर उत्पादनात घट होणार असल्याने आगामी काळात साखरेच्या दरात वाढ होईल, अशी स्थिती आहे. 

हेही वाचा - महाविकास आघाडीचे नगर, सोलापूरला पहिले गिफ्ट 

गाळपाची सद्यस्थिती 

  • एकूण कारखाने : 143 
  • आतापर्यंत उसाचे गाळप : 245 लाख टन 
  • गतवर्षी उसाचे गाळप : 952 लाख टन 
  • एफआरपी थकली : 735.93 कोटी 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 735 crores of farmers tired of sugar factories in the maharashtra