जिल्ह्यात नवे 763 रुग्ण; 34 मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 September 2020

महापालिका क्षेत्रातही आज नवे 337 रुग्ण आढळले. जिल्ह्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाबद्दल चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून रुग्णसंख्या 17 हजार पार झाली आहे. 

सांगली ः जिल्ह्यात आज नवे 763 रुग्ण आढळले. गेले सहा दिवस सरासरी रोज सातशेंच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. दिवसभरात जिल्ह्यात 34 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये परजिल्ह्यातील सात जणांचा समावेश आहे. महापालिका क्षेत्रातही आज नवे 337 रुग्ण आढळले. जिल्ह्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाबद्दल चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून रुग्णसंख्या 17 हजार पार झाली आहे. 

आरटीपीसीआर 1268 चाचण्यांपैकी 389 जण बाधित आढळले, तर प्रतिजन चाचणीत 1191 पैकी 387 जण बाधित आढळले. चाचण्यांची संख्या वाढली तर रुग्णसंख्या आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. आटपाडी तालुक्‍यात 25, जतमध्ये 13, कडेगावमध्ये 59, कवठेमहांकाळमध्ये 27, खानापूर तालुक्‍यात 30, मिरज तालुक्‍यात 62, पलुसमध्ये 48, तर शिराळा तालुक्‍यात 33 नवे बाधित आढळून आले. 

मृतामध्ये नागठाणे, वाटेगाव, जुनेखेड, आष्टा, चिकुर्डे (वाळवा), हिंगणगाव (कवठेमहांकाळ), मिरज, बुधगाव, कुपवाड (ता. मिरज), अंकलखोप (पलूस), माधवनगर, कवठेपिरान, दुधगाव (मिरज), सांगली, विटा येथे दोन, मणेराजुरी (तासगाव), जत, मिरज, पायाप्पाचीवाडी (मिरज), आमणापूर (पलूस) येथे दोन, इस्लामपूर, सांगलीत दोन, मिरज, कवलापूर (मिरज) येथील रुग्णांचा आज मृत्यू झाला. जिल्ह्याबाहेरील सात जणांचा मृत्यू झाला. जयसिंगपूर, शिरोळ, पंढरपुर, कराड, मलकापूर, कराड, जयसिंगपूर येथील रुग्णांचा समावेश आहे. केवळ जिल्ह्याबाहेरील 122 जणांचा आतापर्यंत सांगली जिल्ह्यात उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. 

दिवसभरात 363 कोरोनामुक्त 
आज दिवसभरात 363 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच 784 जणांची प्रकृती चिंताजनक असून 641 जण ऑक्‍सिजनवर आहेत. उर्वरित रुग्ण व्हेन्टिलेटरवर आहेत. 

 

  • आजचे नवीन बाधित-763 
  • उपचाराखालील रुग्ण-7300 
  • बरे झालेले रुग्ण-9065 
  • आजतागायतचे बाधित-17025 
  • चिंताजनक रुग्णसंख्या-784 
  • आजतागायतचे मृत्यू - 660 
  • ग्रामीण भागातील बाधित रुग्ण-6598 
  • शहरी भागातील बाधित रुग्ण-2024 
  • महापालिका क्षेत्रातील बाधित रुग्ण-8403 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 763 new patients in the district; 34 deaths