esakal | खळबळजनक! इस्लामपुरात रस्त्यावर विनाकारण फिरणारे 8 जण कोरोना पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

खळबळजनक! इस्लामपुरात रस्त्यावर विनाकराण फिरणारे 8 जण कोरोना पॉझिटिव्ह

खळबळजनक! इस्लामपुरात रस्त्यावर विनाकराण फिरणारे 8 जण कोरोना पॉझिटिव्ह

sakal_logo
By
धर्मवीर पाटील

इस्लामपूर (सांगली) : शहरात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर सुरू असलेल्या रॅपिड अँटिजेन तपासणीच्या कारवाईत आज सकाळी शिराळा नका परिसरात आठ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. याच कारवाईत काल तिघे जण पॉझिटिव्ह आढळले होते. हे लोक 'कोरोनास्प्रेडर' ठरत असून धोकादायक बनत आहेत. वाळवा तालुका आरोग्य विभागाने ही कारवाई केली. पॉझिटिव्ह आढळलेले हे आठजण वाळवा तालुक्यातील रेठरे व शिवपुरी येथील आहेत. तर एक व्यक्ती सांगलीहुन इस्लामपुरात कामाच्या निमित्ताने आला होता.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वाळवा तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहाता सर्व प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी यांची बैठक घेतली. त्यात तालुक्यात कडक उपाययोजना अमंलात आणण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार इस्लामपूर शहर व इतर ग्रामीण भागातील विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर कारवाईचा बडगा उगरण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. वाळवा पंचायत समिती, आरोग्य विभाग, नगरपालिका व पोलिस प्रशासनाने फिरते कोविड १९ तपासणीचे पथक तयार करून कालपासून अंमलबजावणी सुरू केली आहे. काल ९७ जणांची तपासणी झाली होती, त्यात तिघे पॉझिटिव्ह आढळले.

आज सकाळी शिराळा नाक्यावर धक्कादायकरित्या आठजण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांच्यावर कोविड सेंटरमध्ये उपचाराची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी साकेत पाटील यांनी सांगितले आहे. तहसीलदार रविंद्र सबनीस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, मुख्याधिकारी अरविंद माळी, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यंत्रणा हाताळत आहेत.

loading image