पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे 80 कोटी आले...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

सांगली जिल्ह्यातील 28 हजार 404 शेतकऱ्यांचा 186 कोटी रुपयांची कर्जमाफीचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आला होता. पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्यात 80 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.

सांगली ः ऑगस्ट 2019 मध्ये आलेल्या महापुरामुळे चार तालुक्‍यांतील शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. महापुराने 52 हजार हेक्‍टरवरील क्षेत्र बाधित झाले होते. पूरबाधित शेतकऱ्यांना एक लाख रुपयांचे कर्ज माफ आणि बिगर कर्जदारांना तिप्पट नुकसानभरपाई देण्याचे जाहीर करण्यात आले होते. यानुसार जिल्ह्यातील 28 हजार 404 शेतकऱ्यांचा 186 कोटी रुपयांची कर्जमाफीचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आला होता. पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्यात 80 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. जिल्हा उपनिबंधांकडून याद्या तयार करण्यात येत आहेत. त्यानंतर कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. 

वाळवा, पलूस, शिराळा आणि मिरज तालुक्‍यांतील शेतीसह जनावरांचे मोठे नुकसान झाले होते. चार तालुक्‍यांतील 104 गावांना फटका बसला होता. एक लाख चौदा हजार बाधित कुटुंब आहेत. जिल्ह्यातील 1 लाख 20 हजार 231 बाधित शेतकऱ्यांचे नजर अंदाजे 66 हजार हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले होते. प्रत्यक्षात पंचनामा झाल्यानंतर सुमारे 52 हजार हेक्‍टरवरील पिके वाया गेल्याचे स्पष्ट झाले होते.

शेती पिकांच्या नुकसानीत सर्वाधिक नुकसान उसाचे म्हणजे 36 हजार हेक्‍टर क्षेत्रातील झाले होते. त्यानंतर मक्का, सोयाबीन, केळी, द्राक्षांसह अन्य क्षेत्राचा समावेश आहे. पिकांचे नुकसान काढताना सरासरी उत्पन्न आणि हमीभावाप्रमाणे काढण्यात आले आहे. गाय, म्हैस, जनावरे, मेंढी, बकरी, डुक्कर, बैल, वासरू, गाढव, अशा 62 हजार 145 अशा पशुधनाचे नुकसान झाले. त्याचे 1 कोटी 43 लाखांचे नुकसान झाले होते. 
महापुराच्या कालावधीत शासनाकडून अपेक्षित मदत मिळणे आवश्‍यक होते.

तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे एक लाख रुपयांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. याशिवाय ज्या शेतकऱ्यांचे कर्ज नाही, त्यांना तिप्पट नुकसानभरपाई देण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाने केंद्राच्या एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे नुकसानीची आकडेवाडी निश्‍चित केली. त्यानंतर प्रशासनाने कर्जदार शेतकरी तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांची यादी तयार करून त्याबाबतचा अहवाल राज्य शासनाला पाठविला आहे. 28 हजार 404 पूरबाधित शेतकरी असून 186 कोटी रुपयांची कर्जमाफीचा प्रस्ताव दिला होता.

याशिवाय तिप्पट नुकसान भरपाईसाठी कृष्णा आणि वारणा नदीकाठावरील 92 हजार 441 शेतकऱ्यांचे 38 हजार 116 हेक्‍टरवरील नुकसान झाले. या शेतकऱ्यांसाठी 130 कोटी 64 लाख रुपयांच्या मदतीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यासाठी 80 कोटींची रक्कम प्राप्त झाली असून ती शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर जमा केली जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 80 crores of loan waiver of flood-hit farmers comes ...