
‘टेंभू’ला अडीच वर्षांत ८८० कोटी
सांगली - राज्यातील सत्तानाट्यात खानापूरचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर सहभागी झाले आहे. त्यांनी हे बंड राजकीय स्वार्थासाठी नव्हे, तर टेंभू योजनेच्या पूर्ततेसाठी केल्याचे म्हटले आहे. त्यावर राष्ट्रावादीने गेल्या अडीच वर्षांत टेंभू योजनेवर झालेला खर्च, त्याची मंजुरी, मान्यता याचा आलेख समोर ठेवला आहे. त्यानुसार, महाविकास आघाडी सरकारच्या काळात या योजनेसाठी ८८० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून कोयना धरणातील आठ टीएमसी अतिरिक्त पाणी राखीव ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
आमदार अनिल बाबर यांना टेंभू योजनेचे जनक मानले जाते. या योजनेच्या पूर्ततेसाठी त्यांनी संघर्ष केल्याचे मान्यही केले जाते. परंतु, त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासमवेत जात शिवसेनेविरुद्ध बंड करताना ‘टेंभू’चा दाखला दिल्याने वाद पेटला आहे. विट्यातील राष्ट्रवादीचे नेते वैभव पाटील यांनी ‘टेंभू’चे कारण हे नाटक असल्याची टीका केली आहे. आता जलसंपदा विभागाची माहिती चित्र स्पष्ट करणारी आहे.
टेंभू योजनेला ४ हजार ८८ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता आहे. पैकी ३१ मार्च २०२१ अखेर २ हजार ७५८ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात या योजनेसाठी २२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विधानसभेत या योजनेला गती देण्याबाबत आमदार अनिल बाबर यांनी प्रश्न मांडला होता. त्यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी, ‘आमदार अनिल बाबर यांना पुन्हा या प्रश्नावर विधानसभेत बोलण्याची गरज लागणार नाही,’ अशी ग्वाही दिली होती.
आमदार बाबर यांच्या बंडामागे ‘टेंभू’पेक्षा खानापूर-आटपाडी मतदार संघातील त्यांची राजकीय कोंडी हे प्रमुख कारण सांगितले जात आहे. त्यांचे प्रमुख विरोधक, माजी आमदार सदाशिवराव पाटील यांना जयंत पाटील यांना पाठबळ दिले. सोबतच, जयंतरावांनी आटपाडीतील प्रमुख नेते, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनाही गळ टाकून ठेवला. ही बेरीज झाली तर भविष्यात बाबर यांच्यासाठी डोकेदुखी ठरणारी आहे. महाविकास आघाडीत ही जागा कोणत्या पक्षाला गेली तरी बंड ठरलेले आहे. अशावेळी पक्ष-अपक्षांपेक्षा बाबर विरोधकांना महाविकास आघाडी सरकारची रसद हीच बाबर यांच्या मनातील खदखद होती, असे राजकीय जाणकार सांगतात.
सर्वाधिक निधी ‘टेंभू’ला
सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात राज्यातील विविध उपसा सिंचन योजनांच्या निधीचा तक्ता समोर आला आहे. त्यात सर्वाधिक २२० कोटी रुपयांचा निधी टेंभू योजनेला मंजूर आहे. अर्थात, या निधीवरून बाबर आणि राष्ट्रवादीत; एवढेच काय, भाजप खासदार संजय पाटील यांच्यातही श्रेयवाद रंगलेला आहे.
Web Title: 880 Crore To Tembhu In Two And A Half Years
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..