तीन महिन्यांत होणार बळीराजा कर्जमुक्त

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 March 2020

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यातील 90 हजार 107 शेतकरी पात्र ठरले आहेत.

सांगली ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील 90 हजार 107 शेतकरी पात्र ठरले आहेत.

सरकारने येत्या तीन महिन्यांत त्यांच्या खात्यावर रक्कम जमा करीत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांना 528 कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे. कर्जमाफीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी येत्या तीन महिन्यांत शेतकऱ्यांना पैसे दिले जातील, असा प्रयत्न राज्य शासनामार्फत केला जात असल्याचे विधानसभेत झालेल्या चर्चेत स्पष्ट केले आहे.

कर्जमुक्ती योजनेचा जिल्ह्यातील मिरज तालुक्‍यातील म्हैसाळ, आटपाडी तालुक्‍यातील बनपुरी येथील थकबाकीदार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण 24 फेब्रुवारी रोजी देण्यात आली आहेत. कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी प्रशासन सतर्क असून जिल्ह्यातील 90 हजार 107 थकबाकीदार शेतकरी सभासदांची जवळपास 528 कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे. या सर्व शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केल्या आहेत. या याद्या ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, विकास सोसायटी तसेच जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या संबंधित शाखेत लावल्या जाणार आहेत. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांची सुरू असलेली चर्चा या सरकारच्या निर्णयाबाबतही सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारने अद्यापही नियमित शेतकऱ्यांबाबत काही एक निर्णय जाहीर केलेला नाही. सध्या तरी त्यांना प्रत्येकी 50 हजार रुपये कर्जमाफीबाबत चर्चा सुरू झालेली आहे. दोन लाखांवरील शेतकऱ्यांचेही किमान दोन लाख कर्जमाफी व्हावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. 

राज्य सरकारने घेतलेल्या कर्जमाफीचा निर्णय चांगला आहे. मात्र नियमित कर्जदार यांच्यासाठी तातडीने धोरण जाहीर करायलाच हवे. शिवाय ज्यांची कर्जे दोन लाखांवर आहेत. त्यांच्यासाठी किमान दोन लाख माफी गरजेची होती.
- रावसाहेब पाटील, कांचनपूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 90 thousand farmers will be loan free in three months in sangali district