चिल्ड्रन पार्कसाठी 91 लाखांचा निधी पळवला

बलराज पवार 
Thursday, 31 December 2020

महापालिकेच्या महिला व बाल कल्याणचा 91 लाखांचा निधी प्रशासनाने समितीची मान्यता न घेताच परस्परच चिल्ड्रन पार्कसाठी पळवल्याचा आरोप समितीच्या सदस्या नगरसेविका आरती वळवडे यांनी केला. 

सांगली : महापालिकेच्या महिला व बाल कल्याणचा 91 लाखांचा निधी प्रशासनाने समितीची मान्यता न घेताच परस्परच चिल्ड्रन पार्कसाठी पळवल्याचा आरोप समितीच्या सदस्या नगरसेविका आरती वळवडे यांनी केला. 

अंदाजपत्रकात महिला व बालकल्याण समितीसाठी पाच टक्के निधी राखीव आहे. मात्र कोरोनामुळे वर्षभरात समितीची सभा होऊ शकली नाही. त्यामुळे हा निधी खर्च झाला नाही. पण, बांधकाम विभागाने महापालिकेच्या मालकीच्या नेमिनाथनगर येथील सि. स. नंबर 352 या खुल्या भूखंडावर चिल्ड्रन पार्क विकसित करण्याचा विषय स्थायी समितीसमोर आणला आहे. पण, महिला व बाल कल्याण समितीच्या मान्यतेविनाच 91 लाखांचा निधी चिल्ड्रन पार्कसाठी कसा काय वर्ग केला, अशी चर्चा समितीच्या सदस्यांत सुरु झाली. 

खासगी जागेत चिल्ड्रन पार्क? 
आमदार सुधीर गाडगीळ यांनी नेमिनाथनगरमधील एका जागेवर अत्याधुनिक नाट्यगृह उभारण्याचा प्रस्ताव दिला होता. त्याचा आराखडाही तयार केला. पण सदरची जागा खासगी व्यक्तीच्या नावावर असून, त्यावर आरक्षण असल्याचा मुद्दा उपस्थित करीत नाट्यगृहाचा विषय फेटाळला होता. आता याच जागेवर चिल्ड्रन पार्क कसे होणार? असा प्रश्न नगरसेवकांनाही पडला आहे. 

नगरविकास मंत्र्यांना साकडे 
समितीच्या सदस्या आरती वळवडे यांनी थेट नगरविकास मंत्री शिंदे यांनाच पत्र पाठवून, समितीची मान्यता न घेता सदस्यांना अंधारात ठेवून परस्परच चिल्ड्रन पार्क विकसित करण्याचा विषय स्थायी समितीसमोर आणला आहे. हा प्रकार महिला सदस्यांच्या अधिकारावर गदा आणणारा असल्याने स्थायी समितीने ठराव केला तरी, तो तात्काळ रद्द करावा, अशी मागणी केली आहे.

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 91 lakh was raised for the Children's Park