९६ कंटनेर द्राक्षे जिल्ह्यातून परदेशात

- रवींद्र माने
शनिवार, 21 जानेवारी 2017

तासगाव - जिल्ह्यात द्राक्ष हंगाम आता पूर्ण क्षमतेने सुरू झाला असून, १२३२ टन द्राक्षे श्रीलंका, युएई, सौदी अरेबिया, रशियाला निर्यात झाली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी द्राक्ष निर्यात वाढली असून, द्राक्षाला दरही चांगला मिळत असल्याने निर्यातक्षम द्राक्षबागातयदार खुशीत आहेत. जिल्ह्यातून ९६ कंटेनर रवाना झाले आहेत.

तासगाव - जिल्ह्यात द्राक्ष हंगाम आता पूर्ण क्षमतेने सुरू झाला असून, १२३२ टन द्राक्षे श्रीलंका, युएई, सौदी अरेबिया, रशियाला निर्यात झाली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी द्राक्ष निर्यात वाढली असून, द्राक्षाला दरही चांगला मिळत असल्याने निर्यातक्षम द्राक्षबागातयदार खुशीत आहेत. जिल्ह्यातून ९६ कंटेनर रवाना झाले आहेत.

यावर्षी द्राक्षहंगामाच्या सुरवातीला नोटाबंदीचा परिणाम जाणवला; मात्र आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. तासगाव तालुक्‍यातील पूर्व भागातील जरंडी डोंगरसोनी, सावळज, दहिवडी, सिद्धेवाडी, वायफळे भागातून मोठ्या प्रमाणावर द्राक्ष निर्यात सुरू असून, श्रीलंका रशियासह बांगला देश, रशिया, दुबईला मोठ्याप्रमाणावर द्राक्षे निर्यात होत आहेत. यावर्षी द्राक्षांवर रोगराई कमी असल्याने द्राक्षांचा दर्जाही सुधारला आहे. द्राक्षांचे उत्पादन वाढले आहे. वजन, रंग याबाबतीत द्राक्षे निर्यातीस योग्य असल्याने स्थानिक बाजारपेठेपेक्षा शेतकऱ्यांचा ओढा निर्यातीकडे जादा असल्याचे दिसत आहे. 

माणिक चमन, तास ए गणेश, सोनाका या द्राक्षांना निर्यातीसाठी सध्या मागणी आहे. युरोप सारख्या रेसिड्यू व अन्य अटी नियम नसल्याने मोठ्या प्रमाणावर ही द्राक्षे निर्यात होताना दिसत आहेत. रंग हिरवा, आणि टपोऱ्या जाड द्राक्षांना चांगली मागणी आणि दर मिळताना दिसत आहेत. सध्या थर्मोकोल पॅकिंग आणि पनेट पॅकिंग अशा दोन प्रकारांमध्ये ही द्राक्षे पॅकिंग करून प्रिकूलिंग करून पुढे कंटेनरने पाठविली जातात. द्राक्षबागेतच ही द्राक्षे पॅकिंग केली जातात. थर्मोकोल आणि पनेट पॅकिंगचे दर वेगवेगळे आहेत. द्राक्षाच्या प्रतवारी आणि गुणवत्तेप्रमाणे दर मिळत असून २६० ते ३०० रुपये पेटी असा दर मिळत असल्याने शेतकरी खुशीत आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत निर्यातही वाढली आहे आणि दरही ४० ते ५० रुपये जादा मिळत
आहेत.

आरटीजीएस, धनादेशची चलती
सुदैवाने नोटबंदीचा सुरवातीला झालेला परिणाम पुढे झाला नाही, निर्यातक्षम द्राक्षांसाठी सध्या व्यापारी आणि शेतकरी यांच्यात आरटीजीएस, धनादेश यासारख्या माध्यमातून आर्थिक देवाण-घेवाण सुरू आहे. 

निर्यातक्षम क्षेत्रातही वाढ 
जिल्ह्यातून युरोपसाठी निर्यातक्षम द्राक्षांची नोंदणी ६९५ हेक्‍टर क्षेत्र २१९१ शेतकरी गेल्यावर्षीच्या तुलनेत निर्यातक्षम द्राक्षेक्षेत्रात वाढ. गेल्यावर्षी ५५० हेक्‍टर क्षेत्र नोंद होते, तर १०८१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. यावर्षी तासगाव तालुक्‍यातही निर्यातक्षम द्राक्षाचे क्षेत्र वाढले आहे १५३ हेक्‍टर क्षेत्रावर निर्यातक्षम द्राक्ष  लावण असून ३०५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

२६ पासून युरोपसाठी निर्यात
सध्याच्या निर्यातीमध्ये सावळज आणि मिरज येथील दोन कंपन्या अग्रभागी असल्याचे दिसत आहे. तासगाव तालुक्‍यातून आतापर्यंत १० ते १५ कंटेनर, तर जिल्ह्यातून ९५ कंटेनर द्राक्षे श्रीलंका बांगलादेश, युएई, सौदी अरेबियासाठी निर्यात झाली आहेत. पुढील एक महिना या देशांना निर्यात सुरू राहील, तर जानेवारीच्या २६ तारखेपासून युरोपसाठी निर्यात सुरू होईल. 

Web Title: 96 container grapes export in foreign