
Sangli Police : तीन दिवसांपासून ते लेकरू आपल्या कुटुंबापासून दुरावलं होतं... हरवलं होतं. त्या लेकराच्या विचारानं आई-बापाच्या जिवाची काहिली होत होती. लेकरू कसं असलं, काय खात, पीत असलं, या विचाराने मातेची तर झोप उडाली होती. त्या मातेची धडपड पाहून गावासह पोलिसांना राहवलं नाही. पोलिसांनी आयुष हेल्पलाईन आणि स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली... अखेर एका मंदिरात ते लेकरू खेळत असताना सापडलं. अन् साऱ्यांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला. तासगाव तालुक्यातील पाडळी येथील तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेला अडीच वर्षांचा शंभूराज शशिकांत पाटील हा सुखरूप मातेच्या कुशीत विसावला...