किरकोळ कारणांतून झालेल्या भांडणात, अभिषेकचा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Abhishek's murder Five arrested

किरकोळ कारणांतून झालेल्या भांडणात, अभिषेकचा खून

निपाणी : जुन्या वादातून अभिषेक दत्तवाडे (सैनिक टाकळी, सध्या रा. निपाणी) या युवकाचा खून झाल्याचे पोलिसांच्या तपासातून उघड झाले आहे. या प्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये तीन आरोपी अल्पवयीन आहेत. सैफअली शेरअल्ली नगारजी (वय 22, रा. दर्गागल्ली, निपाणी) आणि अमनहसन एकसंबे (वय 22, रा. जत्राट) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून हिंडलगा कारागृहात रवानगी केली आहे. या खुनाचा कट संबंधित आरोपींनी येथील स्मशानभूमीत रचला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सर्व आरोपी आणि अभिषेक दत्तवाडे यांचे एक महिन्यापूर्वी येथील प्रभात चित्र मंदिराजवळ किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्यावेळी अभिषेकने आरोपींपैकी काही जणांना मारहाण केली होती. तेव्हापासून सर्वांनी अभिषेकचा काटा काढण्याचे ठरविले होते. त्यानुसार तेथील स्मशानभूमीत सर्वजण एकत्र आले. तेथे अभिषेकवर कोणत्या पद्धतीने हल्ला करायचा याबाबत चर्चा केली. त्यानंतर सैफअली याने घरातील चाकु, रॉड व इतर वस्तूंचा पुरवठा केला.

रविवारी सर्व आरोपींनी अभिषेक किती वाजता घरी येतो, त्याची माहिती घेतली. त्यानुसार रात्री 12 नंतर अभिषेक रहात असलेल्या अपार्टमेंटमध्ये खालील मजल्यावर दोघे व वरील मजल्यावर तिघे थांबून होते. अभिषेक चित्रपटगृहातील काम संपवून रात्री 1 वाजता पवन बाजीराव मगर या मित्राच्या दुचाकीवरून घरासमोर आला. अभिषेक जिन्यावरून वर चढतानाच दबा धरून बसलेल्या दोघांनी त्याच्यावर हल्ला केला. त्यानंतर वर थांबलेल्या तिघांनीही चाकूने सपासप वार केले. त्याचवेळी पवन मगर व अभिषेकची आई घटनास्थळी पोचताच सर्वांनी पोबारा केला. वर्मी घाव बसल्याने अभिषेकचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर सर्वच आरोपी पुन्हा स्मशानात येऊन भीमनगरमार्गे राष्ट्रीय महामार्गावरील महात्मा गांधी हॉस्पिटल येथे थांबले. त्यानंतर ट्रकमधून काकतीकडे पलायन केले. काकती येथे रात्रभर एका शेतात जागून काढून पुरावा नष्ट करण्यासाठी ईदगाह जवळ जाऊन रक्ताने माखलेले कपडे जाळून टाकले. दरम्यान या परिसरात आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निम्बर्गी, चिक्कोडीचे पोलिस उपाधीक्षक बसवराज यलिगार, निपाणीचे मंडल पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी, शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक कृष्णवेनी गर्लहोसुर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक डी. बी. कोतवाल व सहकाऱ्यांनी सापळा रचून सर्व आरोपींना जेरबंद केले. त्यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

स्मशानातून खुनाचा कट

किरकोळ भांडणाचे पर्यवसान होऊन त्याचे रुपांतर खुनामध्ये झाले होते. त्यामुळे संबंधित आरोपींनी स्मशानभूमीत खुनाचा कट रचला होता. त्यानंतर काम फत्ते झाल्यावर या स्मशानातच बैठक घेऊन सर्व आरोपी काकतीकडे रवाना झाले होते.

Web Title: Abhisheks Murder Five Arrested Murder Plan In Cemetery

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top