दहावी विद्यार्थ्यांचा 'टक्का' वाढणार ; परीक्षा पुढे ढकलल्याचा परिणाम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

 यंदाच्या शैक्षणिक वर्षाला नैसर्गिक आपत्तीसह संसर्गजन्य आजाराचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अडचणीत आले आहे.

निपाणी - यंदाच्या शैक्षणिक वर्षाला नैसर्गिक आपत्तीसह संसर्गजन्य आजाराचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अडचणीत आले आहे. सर्वप्रथम महापूर आणि आता कोरोनाची धास्ती आहे. यंदाची दहावीची परीक्षा शुक्रवारपासून (ता. 27) सुरु होणार होती. त्याची तयारी शिक्षण खात्याने केली होती. पण कोरोना व्हायरसचा संसर्ग बंगळूरसारख्या शहरात वाढत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचे उपाय म्हणून शासनाने दहावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. अभ्यासाला जादा वेळ मिळाल्याने दहावी विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढणार आहे. 

शुक्रवारपासून परीक्षा सुरु होणार असल्याने विद्यार्थी, पालकांची तयारी पूर्ण झाली होती. परीक्षा केंद्रेही सज्ज ठेवली होती. पण आता परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. अभ्यासासाठी आणखी दहा-पंधरा दिवसाचा कालावधी मिळणार आहे. त्याचा सदुपयोग करून पालक विद्यार्थ्यांना अभ्यासात गुंतवित आहेत. दरवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दहावी परीक्षा पूर्ण होत. त्यानंतर दीड महिन्याच्या कालावधीत अनेक पालक गावी जाण्यासह सहलीचे नियोजन करत होते. पण परीक्षेंच्या वेळापत्रकाबाबत संभ्रमावस्था असल्याने यंदाच्या सहली व गावाच्या सुट्टीचे नियोजन चुकणार आहे. मात्र अभ्यासाला जादा वेळ मिळाल्याने विद्यार्थ्यांसह शाळांच्या निकालाची टक्केवारी निश्‍चितच वाढणार आहे. 

सीसीटीव्हीसाठी जादा वेळ

 यंदा सर्वच परीक्षा केंद्रावरील सर्व खोल्यामध्ये सीसीटीव्ही लावणे बंधनकारक आहे. त्यामुळे अनेक शाळांनी हे कॅमेरे बसविले आहेत. पण अद्याप काही शाळांनी कॅमेरे बसविलेले नाहीत. त्यांना आता पुन्हा जादा वेळ मिळाला आहे. 
 

गेल्या महिन्यापासून विद्यार्थ्यांची उजळणी सुरु आहे. परीक्षा जवळ आल्याने अभ्यासाचा जोर वाढला होता. पण आता परीक्षा पुढे गेल्याने आणखी अभ्यासासाठी वेळ मिळाला आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी सदुपयोग करून घ्यावा. 
-उदय पाटील
उपाध्यक्ष, गोमटेश इंग्लीश मेडियम स्कूल, निपाणी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The academic year has been linked to infectious diseases with natural disasters