दैव बलवत्तर म्हणून वाचला ; ओढ्याजवळचा वळसा लक्षात नाही आला अन् घडली घटना

अनिल पाटील
Monday, 1 February 2021

सोमवारी सकाळी शेतात जाणार्‍या शेतकऱ्यांनी ताबडतोब संतोष पाटील यांना पाण्यातून बाहेर काढले.

कोगनोळी (बेळगाव) : येथील राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या मत्तीवडे रोडवरील ओढ्याच्या पाण्यात रात्रभर पडूनही युवक बचावला. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. संतोष राजाराम पाटील (वय 30, रा. शंकरवाडी, ता. कागल) असे या युवकाचे नाव आहे. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, संतोष पाटील हे आपली मोटार सायकल (एमएच ०९ बीझेड १६६८) घेऊन कागलहून शंकरवाडीकडे जात होते. येथील राष्ट्रीय महामार्गावरून मत्तीवडेमार्गे जाधव ओढ्याजवळ असणारा वळसा लक्षात न आल्याने सुमारे वीस फूट पुलावरून खाली पडले. रात्रभर पाण्यात राहूनही ते बचावले. कागल येथील दुकान बंद करून शंकरवाडीकडे जात असताना ही घटना घडली. 

हेही वाचा - Video : कोल्हापुरात गाढवासह सत्तर डंपरचा मोर्चा काढला कश्यासाठी पाहा व्हिडीओ

सोमवारी सकाळी शेतात जाणार्‍या शेतकऱ्यांनी ताबडतोब संतोष पाटील यांना पाण्यातून बाहेर काढले. ओळख पटत नसल्याने मत्तीवडे येथील ग्रामपंचायत सदस्य राजू डोंगळे यांनी फोटो काढून व्हॉट्सअॅपद्वारे सर्वत्र पाठवले. ते फोटो शंकरवाडी येथील व्हॉटसअॅप ग्रुपवर गेल्याने ओळख पटली. त्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना खासगी वाहनातून कागल येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. 

तोंड पाण्याबाहेर असल्याने बचावले

संतोष पाटील व त्यांची दुचाकी वीस फूट उंचीवरून खाली पडून देखील कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. संपूर्ण शरीर रात्रभर ओढ्यातील पाण्यातच होते. पण केवळ तोंड पाण्याबाहेर असल्याने ते बचावले. त्यामुळे देव तारी त्याला कोण मारी, अशा प्रकारची चर्चा घटनास्थळी सुरू होती.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident in kognoli belgaum but no any dead in this accident in belgaum