मंत्री नवाब मलिक यांच्या वाहनाला केडगावजवळ अपघात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

पोलिस कर्मचारी सतीश खामकर, तान्हाजी पवार, चालक सेवा ट्रस्टचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गोरख कल्हापुरे तत्काळ मदतीसाठी धावले. मोटारीजवळ गेल्यानंतर त्यांना आत मंत्री मलिक असल्याचे लक्षात आले.

नगर ः केडगाव बायपास चौकाजवळ आज सकाळी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या वाहनाला टायर फुटल्याने अपघात झाला. चालकाने प्रसंगावधान राखत, नियंत्रण मिळवून वाहन रस्त्याच्या कडेला घेतले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. 

अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मुंबई येथून परभणीकडे आढावा बैठकीसाठी ते आज नगरमार्गे जात होते. केडगाव बाह्यवळण चौकाजवळ सकाळी साडेदहाच्या सुमारास टोकदार दगडाने त्यांच्या वाहनाचे पुढील टायर फुटले. चालकाने प्रसंगावधान राखत, वाहन डाव्या बाजूने घेत सुमारे तीनशे मीटरवर उभे केले. जागीच ब्रेक दाबले असते, तर वाहन उलटण्याचा धोका होता.

पोलिस कर्मचारी सतीश खामकर, तान्हाजी पवार, चालक सेवा ट्रस्टचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गोरख कल्हापुरे तत्काळ मदतीसाठी धावले. मोटारीजवळ गेल्यानंतर त्यांना आत मंत्री मलिक असल्याचे लक्षात आले. दरम्यान, नगरहून एस्कॉर्टचे वाहन आल्यानंतर, मंत्री नवाब मलिक त्यात बसून शासकीय निवासस्थानी गेले. तेथून ते परभणीच्या दिशेने मार्गस्थ झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The accident of Minister Nawab Malik vehicle near Kedgaon