
ट्रॅक्टरला ओव्हर टेक करीत असताना महामार्गावर मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली.
नेर्ले (सांगली) : येथील आशियायी महामार्गावर सकाळी साडेनऊच्या सुमारास झालेल्या अपघातात येडेनिपाणीतील युवती ठार झाली. अश्विनी आनंदा पावलेकर (वय २२, येडेनिपाणी, ता. वाळवा (सध्या कऱ्हाड) असे ठार झालेल्या युवतीचे नाव आहे.
कासेगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की सकाळी साडेनऊ वाजता अश्विनी पावलेकर ह्या दुचाकी (एम एच ५० जी ३५०१) यावरून कऱ्हाडहून इस्लामपूरला निघाल्या होत्या. हॉटेल मणिकंडन व पेट्रोल पंपासमोर आल्यानंतर ट्रॅक्टरला ओव्हर टेक करीत असताना महामार्गावर मागून भरधाव येणाऱ्या ट्रक (के ए १९ ए बी १९०६) ने अश्विनी यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. अश्विनी यांना गंभीर दुखापत होऊन त्या ठार झाल्या.
महामार्गावर बघ्यांनी गर्दी केली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन कासेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केले. विजय पावलेकर यांनी फिर्याद दिली. ट्रकचालक महंमद अकबर एमशेख अब्दुल कादर (वय २६, कर्नाटक) विरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. सोमनाथ वाघ तपास करीत आहेत.
हेही वाचा - देवाडीच्या शिवारातील पावट्याच्या शेंगांचा झाला ब्रॅंड -
संपादन - स्नेहल कदम