दिवसाढवळ्या पोलिसांवर गोळी झाडली 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

मंगळसूत्रचोरीच्या गुन्ह्यात संशयित असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर आरोपीने पिस्तुलातून गोळी झाडली. त्यात एक कर्मचारी गंभीर जखमी झाला. ही घटना आज दुपारी राहात्यात घडली. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. 

नगर : मंगळसूत्रचोरीच्या गुन्ह्यात संशयित असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर आरोपीने पिस्तुलातून गोळी झाडली. त्यात एक कर्मचारी गंभीर जखमी झाला. ही घटना आज दुपारी राहात्यात घडली. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. 

पोलिस कॉन्स्टेबल अजित अशोक पठारे (नेमणूक राहाता पोलिस ठाणे), असे जखमी पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. सचिन टाके असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. 
राहाता पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या गळ्यांतील मंगळसूत्रांच्या चोरीच्या घटना वाढल्या होत्या. मंगळसूत्रचोरांवर करडी नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी गस्तीपथकांची नियुक्ती केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकासह राहाता पोलिस आरोपींच्या मागावर होते. मंगळसूत्रचोरीच्या गुन्ह्यातील काही संशयित आरोपींची नावे पोलिसांना समजली. 

आरोपींची माहिती मिळाली 

पोलिसांनी त्यांचा तांत्रिक शोध घेतला असता, ते आज राहाता शहरातील चितळी चौकात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आज राहाता पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी चितळी चौकात सापळा लावला. दुपारी दोन वाजता सचिन टाके व त्याचा साथीदार दुचाकीवरून चौकात आले. 

इथे झाडली गोळी 

दुचाकीजवळ आल्यानंतर पोलिस कर्मचारी अजित पठारे, रशीद शेख व पोलिस हवालदार आवारे यांनी ारोपींवर झडप घालण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी सचिन टाके याने पिस्तुलातून गोळी झाडली. ती पोलिस कॉन्स्टेबल अजित अशोक पठारे यांना लागली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी धूम ठोकली होती. 

पाठलाग करून आरोपी पकडला 

दरम्यान, जखमी पठारे यांच्यावर शिर्डी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर पोलिसांनी पाठलाग करून आरोपी सचिन टाके याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्तुल जप्त केला. तर अन्य आरोपी दुचाकीवरून पसार झाला. पोलिस पसार आरोपीचा शोध घेत आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक अशोक थोरात, निरीक्षक वसंत भोये यांनी पथकासह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पकडलेला संशयित आरोपी सचिन ताके हा श्रीरामपूर येथील रहिवासी आहे. 

कायद्याचा धाक संपलाय? 

नगर शहरातील प्रसिद्ध उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांचे खंडणीसाठी नुकतेच अपहरण झाले होते, तर सोलापूर रस्त्यावर शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश मोरे यांच्या पथकाला शिवीगाळ व दमबाजी करण्यात आली. या घटना ताज्या असताना राहाता येथे गुन्हेगारांनी थेट पोलिसांवरच हल्ला केला आहे. यामुळे, जिल्ह्यातील कायद्याचा वचक संपला की काय, असा प्रश्‍न नागरिकांसमोर उभा ठाकला आहे. 

एकाला पकडले 

मंगळसूत्रचोरीच्या गुन्ह्यात संशयित असलेल्या आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथक गेले होते. आरोपीने पोलिस कर्मचाऱ्यावर गोळीबार करून पळ काढला. त्यातील एका आरोपीला पकडले आहे. 
- वसंत भोये, पोलिस निरीक्षक, राहाता पोलिस ठाणे 
....  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The accused fired on police