पोलिसांच्या हाताला हिसका देऊन सांगोल्यात आरोपी पळाला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 डिसेंबर 2019

- आरोपीस कारागृहात नेताना घडली घटना

- दोन आरोपी होती एकत्रित,  पैकी एक पळाला

- अंधाराचाही घेतला आरोपीने फायदा

सांगोला (सोलापूर) : न्यायालयीन कोठडी झालेल्या आरोपीस कारागृहात घेऊन जात असतानाच सांगोला तहसील कार्यालयाच्या गेटवरून आरोपीने पोलिसाच्या हातास हिसका देऊन अंधाराचा फायदा घेऊन पलायन केले. ही घटना शनिवारी (ता. 30) घडली आहे. गणेश ऊर्फ पप्पू दत्तात्रय गस्ते (रा. वाढेगाव, ता. सांगोला) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. 

विशेष खटला क्र. 18/2013 कलम 376(1) पोस्को ऍक्‍टमधील आरोपी गणेश ऊर्फ पप्पू दत्तात्रय गस्ते (रा. वाढेगाव) व समाधान आनंदा फाळके (रा. हलदहिवडी) यांनी अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्याकरता पंढरपूर न्यायालयात अर्ज दिला होता. तो अर्ज न्यायालयाने नामंजूर करून त्यांना न्यायालयीन कोठडीत घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे गणेश ऊर्फ पप्पू गस्ते व समाधान फाळके या दोन्ही आरोपींना पोलिस हेडकॉन्स्टेबल रवींद्र रामचंद्र बनकर यांनी ताब्यात घेऊन पंढरपूरहून सांगोला येथे आणले.

सांगोला येथील तहसील कार्यालय गेटच्या समोर सायंकाळी सव्वासातच्या सुमारास आले असता आरोपी गणेश ऊर्फ पप्पू गस्ते याने बनकर यांच्या डाव्या हाताला हिसका देऊन अंधाराचा फायदा घेऊन पलायन केले. या वेळी पोलिसांनी आरडाओरडा केला परंतु दुसरा आरोपी सोबत असल्याने त्या आरोपीचा पोलिस पाठलाग करू शकले नाहीत. या वेळी दुसरा आरोपी समाधान फाळकेची सांगोला उपकारागृहात रवानगी करून फरारी आरोपीचा शोध घेण्यास पोलिस गेले. पोलिसांनी सांगोला शहर, वाढेगाव, जुनोनी, एखतपूर, हातीदसह परिसरात शोध घेतला. तरी फरार आरोपी गणेश ऊर्फ पप्पू गस्ते हाती लागला नाही. अखेर त्याच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The accused fled from Sangola