मिरजेत जोमात कारवाई, सांगलीत मात्र अभय?  वाहतूक कोंडीत भरच

अजित कुलकर्णी
Sunday, 27 September 2020

महापालिकेने मिरजेत जशी कारवाई करुन रस्त्यावरचे अडथळे दूर केले त्याप्रमाणे सांगलीत का होत नाही, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. 

सांगली : जनता कर्फ्युदरम्यान भाजी विक्रेत्यांना रस्त्यावर बसण्यास महापालिका प्रशासनाने मनाई केली होती. त्यातून आता नवा प्रश्‍न निर्माण झाला आहे. बसून विकण्यास परवानगी नाकारल्याने हातगाडीवर भाजीपाला, फळे, यासह जीवनावश्‍यक वस्तू विक्रीचा फंडा सुरु केला आहे. त्यामुळे आधीच वाहनांची गर्दी असणाऱ्या रस्त्यावर हातगाड्यांचा अडथळा ठरत आहे. महापालिकेने मिरजेत जशी कारवाई करुन रस्त्यावरचे अडथळे दूर केले त्याप्रमाणे सांगलीत का होत नाही, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. 

महापालिका हद्दीतील बहुतांश रस्त्यावर सकाळपासूनच बाजार भरतो. महापालिकेची कारवाई जुजबी असते, हे एव्हाना सर्वज्ञात आहे. त्यामुळे कारवाईचा होणारा फार्स कोण फारसे मनावर घेताना दिसत नसल्याचे चित्र आहे. काही जणांची कोणताही कर न देता रस्त्यावर बसण्याची मक्‍तेदारी निर्माण झाली आहे. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथक प्रमुखापासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सगळ्यांना "खूश' ठेवले की आपणच मालक अशा अविर्भावात ते असतात. 

महापालिका हद्दीत जनता कर्फ्युदरम्यान महापालिकेने गर्दी टाळण्यासाठी शिवाजी मंडईसह भाजीविक्रेते बसणाऱ्या ठिकाणी मनाई केली होती. दररोज सकाळी महापालिकेचे पथक कारवाईसाठी येत असल्याने भाजी विक्रेत्यांना धाक होता. मात्र पथक पुढे गेले की मागे भाजीविक्रेते रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्याचे चित्र होते.

मारुती चौकातील विक्रेत्यांनी चौक सोडून उर्वरित रस्त्यांवर कब्जा केल्यासारखी परिस्थिती आहे. आंबेडकर पुतळ्यापासून मारुती चौकात येणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा हातगाडीवाल्यांचे साम्राज्य आहे. शिवाजी मंडईतील भाजीविक्रेत्यांनी मालविक्रीची पर्यायी व्यवस्था म्हणून हातगाड्यांचा वापर सुरु केल्याने यात वाढच होत आहे. या रस्त्यावर आधीच वाहतुकीची कोंडी होत असून पार्किंग करायचे कोठे, असा प्रश्‍न आहे. 

मिरजेत धडाका; सांगलीत सामसूम 
सध्या सर्वच आठवडा बाजार बंद असल्याने हातगाड्यांची संख्या वाढली आहे. मिरजेत अरुंद रस्त्यांवर हातगाड्यांचे अतिक्रमण वाहतुकीला अडथळा ठरत असल्याच्या तक्रारीवरुन कारवाईचा धडाका सुरु आहे. सांगलीतही तोच प्रश्‍न असल्याने कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र कर्फ्युदरम्यान किरकोळ कारवाई वगळता हातगाड्यांना जणू अधिकृत परवानगी दिली की काय, अशी स्थिती रस्त्यावरुन चालताना दिसते. तक्रारी करुन कारवाई का होत नाही, संबंधितांचे हात बांधले की काय? असा सवाल उपस्थित होत आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action against encroachment in Miraj by corporation, but niglected in Sangli? Full of traffic jams