सॉरी उद्धवजी...अभिनेत्याने मागितली ठाकरेंची जाहीर माफी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

अभिनेते किरण माने हे मूळचे सातारचे आहेत. ते यापुर्वी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करीत असतं. परंतु गेल्या काही दिवसांत ते ठाकरेंचे फॅन झाले आहेत. त्यांना लिहिलेली फेसबुकवरील पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे

सातारा : देशात काेराेना व्हायरसमुळे लाॅक डाऊन करण्यात आले आहे. काेराेनाचा संसर्ग कमी व्हावा यासाठी महाराष्ट्रात देखील माेठ्या प्रमाणात खबरदारी घेतली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आराेग्यमंत्री राजेश टाेपे यांच्या उत्तम समन्वयातून वेळोवेळी जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. या दाेन्ही नेत्यांचे कामाबद्दल त्यांचं सर्वांकडून कौतुक होत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे देखील आता त्यांचे गाेडवे गात आहेत. एका मराठी अभिनेत्याने लिहिलेली फेसबुक पोस्ट सध्या राजकीय वर्तुळाबराेबरच जनसामान्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. ही पाेस्ट लिहिणारे अभिनेते किरण माने यांनी चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर माफीच मागितली आहे.

अभिनेते किरण माने हे मूळचे सातारचे आहेत. ते यापुर्वी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करीत असतं. परंतु गेल्या काही दिवसांत ते ठाकरेंचे फॅन झाले आहेत. त्यांना लिहिलेली फेसबुकवरील पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांनी या पोस्टद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माफी मागितली आहे. सॉरी उद्धवजी.. असं म्हणत त्यांनी त्यांच्या पोस्टची सुरुवात केली आहे. त्यांनी पुढं म्हटलं आहे की, मी किरण माने. मला तुमची माफी मागायचीय. तुम्ही पूर्वीच्या सरकारमध्ये असताना तुमची हतबलता पाहुन खूप टीका केली होती तुमच्यावर ! कणा नसलेला नेता.. ताटाखालचं मांजर म्हणायचो... भाजपासोबत झालेली तुमची फरपट पाहून 'शिवसेनेचा कणखरपणा बाळासाहेबांबरोबर गेला' असं मला वाटायचं' .

पुढे ते म्हणतात आज तुम्ही मला खोटं ठरवलंत. खूप कमी माणसं अशी असतात, जी तुम्हाला चकीत करून टाकतात ! आधी तुमच्या मनात इमेज डागाळलेली असते... अशा काही घटना घडतात की तोच माणूस विजेसारखा लखलखून तुमचे डोळे दिपवून टाकतो ! ऊद्धवजी तुम्ही आज आम्हाला दिपवून टाकताय. आज अत्यंत कठीण परीस्थितीत संपूर्ण महाराष्ट्राला दिलासा देणारं एकमेव कोण असेल तर ते तुम्ही आहात. खालच्या पट्टीत अत्यंत शांत संयमी बोलणं.. मुद्देसूद-थेट बोलणं..सद्यपरीस्थितीबद्दल सतत 'फॅक्‍च्यूअल डेटा' देणं.. बोलताना 'अनावश्‍यक पाल्हाळ' आणि 'डायलॉगबाजी' टाळणं... खरंच चकीत होतोय रोज ! 

'लॉकडाऊन'चा निर्णय खूप आधी आणि योग्य वेळेत घेतला होतात तुम्ही... तो ही थेट प्रशासनामार्फत नोटीस देऊन. लगोलग. 'टीझर-प्रोमो-ऍड-मार्केटिंग आणि मग पिच्चर' अशा फिल्मी गोष्टींत तुम्ही वेळ घालवत बसत नाही. खटक्‍यावर बोट जागेवर पलटी.. मानलं तुम्हाला ! 
कालच 'मास्क'स्‌ चा खूप मोठा, जवळजवळ दोन कोटी रूपये किमतीचा बेकायदा साठा पोलीसांनी पकडणं - विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना दंडुक्‍याचा प्रसाद देऊन घरी पाठवणं - माझं घर साताऱ्यात अजिंक्‍यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. शांत एरीया. तिथपर्यन्तसुद्धा रोज रात्रंदिवस पोलीसांनी गस्त घालणं.. इतकी 'एफिशियन्सी' आम्ही आयुष्यात पहिल्यांदा अनुभवतोय. संपूर्ण प्रशासन हललंय. खूप आधार वाटतोय. 
कठीण काळात तुमच्यासारखं अत्यंत प्रगल्भ नेतृत्त्व लाभणं हे महाराष्ट्राचं भाग्य आहे ! या काळातलं तुमचं काम सुवर्णाक्षरांनी लिहीलं जाणार आहे. पुढच्या पिढ्या तुम्हाला सलाम करणारेत !!! 
धन्यवाद उद्धव बाळासाहेब ठाकरे...मन:पूर्वक धन्यवाद ! 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Kiran Mane Apologies To Maharashtra CM Uddhav Thackarey And Appreciate For Work