सोलापूर : थोबडे यांना शिवा संघटनेची शहर उत्तरची ऑफर 

प्रशांत देशपांडे
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

शिवा संघटनेने भाजपकडे शहर उत्तर, शहर मध्य व अक्‍कलकोट या तीन विधानसभा मतदारसंघाची मागणी केली आहे. त्यापैकी शहर उत्तरच्या जागेसाठी आपला आग्रह असून, तेथून ऍड. मिलिंद थोबडे यांना उमेदवारी देण्याचे नियोजन आहे.

सोलापूर : शिवा संघटनेने भाजपकडे शहर उत्तर, शहर मध्य व अक्‍कलकोट या तीन विधानसभा मतदारसंघाची मागणी केली आहे. त्यापैकी शहर उत्तरच्या जागेसाठी आपला आग्रह असून, तेथून ऍड. मिलिंद थोबडे यांना उमेदवारी देण्याचे नियोजन आहे. सर्वच जागा शिवा संघटना कमळ या चिन्हावर लढेल, अशी माहिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी सकाळशी बोलताना दिली. 

शिवा संघटनेची भाजपसमवेत मैत्री आहे. या पार्श्‍वभूमीवर संघटनेने राज्यातील लोहा (नांदेड), गंगाखेड (परभणी), अहमदपूर (लातूर), सोलापुरातील शहर मध्य, शहर उत्तर आणि अक्कलकोट या सहा विधानसभा मतदारसंघाची मागणी भाजपकडे केली आहे. त्यापैकी सोलापुरातील शहर उत्तर आणि नांदेड जिल्ह्यातील देगलूर या मतदारसंघासाठी आग्रह असल्याचेही प्रा. धोंडे म्हणाले. याबाबत मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा झाल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. तत्पूर्वी, शिवा संघटनेने केलेल्या तीन मागण्या भाजपने मार्गी लावल्या असून, त्यामध्ये वीरशैव अन्‌ लिंगायत वेगळे असल्याचे समजून लिंगायत समाजाने केलेली स्वतंत्र धर्माची मागणी फेटाळली, सोलापूर विद्यापीठात महात्मा बसवेश्‍वर अभ्यास केंद्र सुरू करावे आणि राज्यतस्तरीय शिवा बसव पुरस्काराचे वितरण करावे यांचा समावेश आहे. त्यामुळे समाजाच्या विकासासाठी संघटनेने भाजपशी युती केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

पालकमंत्र्यांना समाज धडा शिकवेल 
विद्यापीठ नामविस्तार लढ्यात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी समाजाला साथ दिली नाही. तर मंगळवेढ्यातील महात्मा बसवेश्‍वरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी पालकमंत्र्यांनी पाठपुरावा न केल्याने अद्याप स्मारकाचे भूमिपूजनही झालेले नाही. या पार्श्‍वभूमीवर लिंगायत समाज विजयकुमार देशमुखांना आगामी विधानसभा निवडणुकीत धडा शिकवेल. ऍड. मिलिंद थोबडे यांच्याशी चर्चा झाली असून त्यांना शहर उत्तरमधून शिवा संघटना उमेदवारी देणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Add. Milind Thobde to the Legislative Assembly from the city north