esakal | विकेंड,नाईट कर्फ्यूत पोलिसांनी बळाचा वापर करू नये; अतिरिक्त पोलीस महासंचालकांची सूचना

बोलून बातमी शोधा

null

विकेंड,नाईट कर्फ्यूत पोलिसांनी बळाचा वापर करू नये; अतिरिक्त पोलीस महासंचालकांची सूचना

sakal_logo
By
अमृत वेताळ

बेळगाव : पोलिसांनी बळाचा वापर न करता नागरिकांना समजावून सांगितले पाहिजे. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मास्क सामाजिक आंतर आणि सॅनिटायझर या तीन शस्त्रांचा वापर केला पाहिजे. लॉकडाऊनमुळे कोणालाही त्रास होऊ नये. अशी सूचना राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व जिल्ह्याचे विशेष कोरोना नियंत्रण विशेष अधिकारी भास्कर राव यांनी केली.मुस्लिम धर्मगुरूंची अंजुमन हॉलमध्ये त्यानी शुक्रवारी (ता.23) सभा घेऊन मार्गदर्शन केले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते पत्रकारांशी बोलत होते.

भास्कर राव म्हणाले, नाईट कर्फ्यू आणि विकेंड कर्फ्यू काळात कोणत्याही कारणावरून लोकावर पोलिसांनी बळाचा वापर करू नये. पोलीसानी मानवतेच्या दृष्टिकोनातून काम केले पाहिजे. विनाकारण दंडात्मक कारवाई करण्यात येऊ नये. अशा परिस्थितीत नागरिकांचा विश्वास संपादन करत कोरोना विरुद्ध लढले पाहिजे, अशा शब्दात त्यांनी पोलिसांची कानउघाडणी केली. अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात बसून बैठका घेण्याऐवजी रस्त्यावर उतरून काम केले पाहिजे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कामाबद्दल लोकांच्या मनात विश्वासाची भावना निर्माण होते.

कोरोना आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल सध्या सोशल मीडियावर चुकीचे संदेश व माहिती पसरविण्यात येत आहे. त्याकडे लक्ष देण्यात येऊ नये. आपत्कालीन सेवेसाठी नागरिकांनी 112 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आव्हानही त्यांनी यावेळी केले. आज मुस्लिम समाजातील प्रमुखांची बैठक घेऊन चर्चा केली आहे. उद्या नागनुर रुद्राक्षी मठ आणि हुक्केरी हिरेमठला भेट देण्यात येणार आहे. तसेच शहरातील चर्चना देखील भेट देऊन चर्चा करण्यात येणार असल्याचे भास्कर राव यांनी सांगितले.

विनाकारण कोणीही घराबाहेर पडत रस्त्यावर फिरू नये अन्यथा संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. विकेंड कर्फ्यू बाबत लोकांच्यामध्ये गोंधळाचे वातावरण आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहतील. असेही त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही परिस्थितीत नागरिकावर पोलीसानी बळाचा वापर करू नये. मानवतेच्या दृष्टिकोनातून कोरोना विरुद्ध लढले पाहिजे. नागरिकांनीदेखील आम्हाला सर्व प्रकारे सहकार्य दिले पाहिजे. अशी विनंती भास्कर राव यांनी केली.यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, पोलीस उपायुक्त यशोदा वंटगोडी, मुत्तुराज एम., अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख अमरनाथ रेड्डी यांच्यासह जिल्ह्यातील व शहरातील इतर पोलिस अधिकारी उपस्थित होते.

Edited By- Archana Banage