भोसेतील वटवृक्षासाठी आदित्य ठाकरे यांचे नितीन गडकरींना पत्र 

अजित झळके
Friday, 17 July 2020

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामात तब्बल 400 वर्षे जुने असणारे, परंपरेचा वारसदार असणारा एक डौलदार वटवृक्ष जमिनदोस्त होणार आहे. हे झाड या भागाची ओळख आहेच, शिवाय वटवाघुळांसह अनेक पक्षांचे आश्रयस्थान आहे.

सांगली ः रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामात तब्बल 400 वर्षे जुने असणारे, परंपरेचा वारसदार असणारा एक डौलदार वटवृक्ष जमिनदोस्त होणार आहे. हे झाड या भागाची ओळख आहेच, शिवाय वटवाघुळांसह अनेक पक्षांचे आश्रयस्थान आहे.

त्यामुळे हे झाड वाचवावे, महामार्ग पर्यायी जागेतून वळवावा, अशी विनंती राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना केली आहे. त्यासाठी आदित्य यांनी एक पत्र श्री. गडकरी यांना पाठवले आहे. त्यामुळे हे झाड वाचेल, अशा आशा जागृत झाल्या आहेत. 

रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम गतीने सुरु आहे. मिरज पूर्व भागातील भोसे-खामकर वस्ती येथील यल्लम्मा मंदीर जवळून हा मार्ग जातो. या मार्गातील हजारो झाडे याआधी तोडण्यात आली आहेत. भोसेतील यल्लम्मा मंदीराजवळील वटवृक्षाला धक्का लागणार ही माहिती समोर आल्यानंतर सांगली जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी पुढे धावले. त्यांनी "मला वाचवा' या मोहिमेला सुरवात केली. शेकडो वृक्षप्रेमी आणि ग्रामस्थांनी झाडाला मिठी मारून आंदोलन केले. त्या भागातील वारकऱ्यांचे हे आश्रयस्थान आहे. तेथे पंढरपूर दिंडीचा मुक्काम पडतो.

त्याच्या आठवणीही जागवल्या गेल्या. त्याची दखल आदित्य ठाकरे यांनी घेतली आणि याबाबतची सविस्तर माहिती मागवून घेतली. त्यानंतर तातडीने त्यांनी नितीन गडकरी यांना पत्रव्यवहार केला आहे. 

तांत्रिकदृष्ट्या पाहता आता महामार्ग वळवण्याचा निर्णय आव्हानात्मक आहे आणि तो फक्त आणि फक्त नितीन गडकरीच घेऊ शकतात, हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी गडकरी यांना पत्र लिहल्याने झाड वाचण्याच्या शक्‍यता वाढल्या आहेत. पर्यावरण प्रेमींच्या आंदोलनाला आदित्य यांनी दिलेला तत्काळ प्रतिसाद आणि त्यानंतर घेतलेली भूमिका स्वागतार्ह्य असून त्याची आता सोशल मिडियात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aditya Thakare write letter to nitin gadkari about save tree in bhose