किती शाळा सुरू होणार प्रशासनालाच नाही माहिती

अजित झळके
Monday, 23 November 2020

कोरोना संकटकाळात 15 मार्चपासून बंद असलेल्या शाळा  23 पासून सुरू करण्याचे आदेश आहेत; मात्र जिल्ह्यातील 750 पैकी किती शाळा सुरू होणार, याची माहिती शिक्षण विभागाकडेही उपलब्ध नाही.

 सांगली : कोरोना संकटकाळात 15 मार्चपासून बंद असलेल्या शाळा  23 पासून सुरू करण्याचे आदेश आहेत; मात्र जिल्ह्यातील 750 पैकी किती शाळा सुरू होणार, याची माहिती शिक्षण विभागाकडेही उपलब्ध नाही. स्थानिक व्यवस्थापन समित्यांनी त्याबाबत निर्णय घ्यावा, असे आदेश आहेत. त्यातच कोरोनाची नवी लाट येईल, अशी भीती आहे. त्यामुळे पुरती गोंधळाची परिस्थिती आहे. 

जिल्ह्यात नववी ते बारावीचे वर्ग असलेल्या 750 शाळा आहेत. त्यात 1 लाख 47 हजार विद्यार्थी शिकत आहेत. त्यांची खंडित झालेली शिक्षण प्रक्रिया सुरू होत असताना राज्य शासनही गोंधळलेले आहे. शिक्षणमंत्री डॉ. वर्षा गायकवाड यांनी स्थानिक व्यवस्थापन समितीवर जबाबदारी सोपवली आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मात्र या स्थितीत शाळा सुरू करण्याचा पुनर्विचार करावा लागेल, असे विधान आज केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात नेमके काय घडणार? पालक मुलांना शाळेत पाठवताना संमतिपत्र देणार का? याकडे लक्ष असणार आहे. 

या स्थितीत जिल्ह्यातील 22 शिक्षक कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. परगावचे विद्यार्थी प्रवास करून कसे येणार, याबाबतही मोठे कोडे आहे. अकरावी, बारावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांपुढे प्रवासाचा मोठा प्रश्‍न आहे. या साऱ्यावर मात करून शाळा कशा भरणार, याबाबत उत्सुकता आहे. 

शिक्षणाधिकारी "स्विच ऑफ' 
माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सुधाकर तेलंग यांचा मोबाईल आज स्विच ऑफ झाला होता. त्यांच्या दोन्ही क्रमांकांवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र संपर्क होऊ शकला नाही. शिक्षण व्यवस्थेतील एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर यंत्रणा काम करत असताना ते संपर्काबाहेर राहिले. त्यामुळे नेमकी व्यवस्था काय, याबाबत माहिती मिळू शकली नाही. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The administration does not know how many schools will be started today