नागाव येथील कारभार अजूनही धोकादायक इमारतीतून

अमोल पवार 
Friday, 15 January 2021

नागाव (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायतीच्या जीर्ण इमारतीत कर्मचारी व अधिकारी जीव मुठीत धरून काम करीत आहेत. नवीन इमारतीसाठी स्थानिक प्रशासनाने वेळोवेळी वरिष्ठांना प्रस्ताव पाठवूनसुध्दा कोणताही निधी उपलब्ध झाला नसल्याने कारभार अजूनही धोकादायक इमारतीतून सुरू आहे. 

बागणी : नागाव (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायतीच्या जीर्ण इमारतीत कर्मचारी व अधिकारी जीव मुठीत धरून काम करीत आहेत. नवीन इमारतीसाठी स्थानिक प्रशासनाने वेळोवेळी वरिष्ठांना प्रस्ताव पाठवूनसुध्दा कोणताही निधी उपलब्ध झाला नसल्याने कारभार अजूनही धोकादायक इमारतीतून सुरू आहे. 

ग्रामपंचायत इमारतीच्या जागी नवीन इमारत बांधण्यासाठी दिलेल्या प्रस्तावाला अद्यापही मान्यता मिळालेली नाही. कारभार सध्याच्याच धोकादायक इमारतीतून सुरू आहे. ग्रामपंचायतीची स्वमालकीची इमारतीत नसल्याने कार्यालयीन कामकाज 50 वर्षे समाज मंदिरात सुरू आहे. ग्रामपंचायत, ग्रामविकास, तलाठी, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा, सभागृह या विभागाचे कामकाज तेथूनच चालते. रोज शेकडो नागरीकांची ये-जा सुरू असते. इमारतीच्या भिंतीला भेगा पडून दगड माती कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. 

कित्येकदा अधिकारी व ग्रामस्थ अपघातापासून बचावलेत. पंचायत समिती व जिल्हा परिषदेची उदासीनता त्यात अधिकाऱ्यांचा वेळकाढूपणा यातच प्रस्ताव रेंगाळला आहे. सध्याची इमारत सन 1969 मध्ये बांधली आहे. नवीन इमारतीसाठी 18 लाखांचा निधी मिळावा म्हणून प्रस्ताव सादर केला आहे. मात्र पाठपुरावा झालेला नाही. पडझड होऊन दुर्घटना घडल्यानंतरच संबंधित विभागाला जाग येणार काय ? असा सवाल नागरिकांतून केला जात आहे. 

नविन इमारतीचा प्रस्ताव ग्रामसभेत मंजूर करून प्रशासकीय मंजूरीसाठी वरिष्ठ कार्यालयात देऊन वर्ष झाले. त्यावर कार्यवाही झालेली नाही. 
- शुभांगी भारती, ग्रामसेविका

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
सांगली 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The administration at Nagaon is still in a dangerous building