गंभीर रूग्णांनाच "डीसीएच' मध्ये दाखल करा : जिल्हाधिकारी डॉ. चौधरी...पथकाला तपासणीबाबत सूचना 

घनश्‍याम नवाथे
Sunday, 6 September 2020

सांगली- जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असून गंभीर रूग्णांना तत्काळ बेड्‌स उपलब्ध होणे आवश्‍यक आहे. गंभीर रूग्णांनाच डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल (डीसीएच) मध्ये दाखल करा. सौम्य लक्षणे व लक्षणे नसणाऱ्या रूग्णांना तपासणीनंतर आवश्‍यकतेप्रमाणे "डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर', "कोरोना केअर सेंटर' किंवा होम आयसोलेशनमध्ये उपचाराखाली ठेवावे. त्यासाठी तपासणी पथक व "टास्क फोर्स टीम' ने प्रत्येक हॉस्पीटलमध्ये पाहणी करावी अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या. 

सांगली- जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असून गंभीर रूग्णांना तत्काळ बेड्‌स उपलब्ध होणे आवश्‍यक आहे. गंभीर रूग्णांनाच डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल (डीसीएच) मध्ये दाखल करा. सौम्य लक्षणे व लक्षणे नसणाऱ्या रूग्णांना तपासणीनंतर आवश्‍यकतेप्रमाणे "डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर', "कोरोना केअर सेंटर' किंवा होम आयसोलेशनमध्ये उपचाराखाली ठेवावे. त्यासाठी तपासणी पथक व "टास्क फोर्स टीम' ने प्रत्येक हॉस्पीटलमध्ये पाहणी करावी अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या. 

कोरोना बाधित रूग्णांसाठी सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या बेड्‌सचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील डीसीएचचे डॉक्‍टर्स, तपासणी पथक व टास्क फोस्ट टीमसमवेत बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, उपजिल्हाधिकारी (महसूल) विजया यादव उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, ""डीसीएच मध्ये ज्या रूग्णांची प्रकृती स्थीर झाली आहे, अशा रूग्णांना हॉटेल, लॉज किंवा होस्टेलमध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. त्या ठिकाणी उपचार द्यावेत. डॉक्‍टरांनी त्यांच्याकडील रूग्णांचे उपचाराबाबत समुपदेशन करावे. प्रत्येक रूग्णालयाने त्यांच्याकडील बेड्‌स, दाखल रूग्ण आणि शिल्लक बेड्‌स याचा फलक दर्शनी भागात लावावा. त्यावरील माहिती अद्ययावत ठेवावी. त्याचबरोबर "बेड इन्फॉर्मेशन सिस्टीम' नियमितपणे वेळेत अद्ययावत करावी. त्यामुळे रूग्णांना कोणत्या रूग्णालयात किती बेडस्‌ उपलब्ध आहेत, याची माहिती मिळेल. जी रूग्णालये दाखल करून घेण्यासाठी अनामत रक्‍कम मागतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. "डीसीएच' मध्ये गरज नसलेले रूग्ण बेड्‌स व्यापून ठेवणार नाहीत याची खात्री करावी. त्यासाठी तपासणी पथक व टास्क फोर्स टीमने तपासणी करावी. रूग्णांच्या सद्यस्थितीबाबत नातेवाईकांना दिवसातून दोन वेळा माहिती द्यावी.'' 
 

खासगी रूग्णालये बंद ठेवल्यास कारवाई- 
सामान्य जनतेला आरोग्य विषयक सेवा देणे अत्यंत आवश्‍यक असताना जिल्ह्यामधील काही खासगी रूग्णालये बंद ठेवल्याचे निदर्शनास आले आहे. सर्व नोंदणीकृत खासगी रूग्णालये, मान्यता प्राप्त वैद्यकीय व्यावसायिकांनी रूग्णांना वैद्यकीय सेवा देणे बंधनकारक आहे. आदेशाचा भंग करणाऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल केले जातील. त्यासाठी संबंधित पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले. 
 

रूग्णांनी प्लाझ्मा दान करावा- 
शासनाने "प्लॅटिना' रक्तद्रव उपचाराबाबत संशोधन प्रकल्प 29 जूनपासून सुरू केलेला आहे. मिरज वैद्यकीय महाविद्यालयासह राज्यातील 14 वैद्यकिय महाविद्यालयांना सहभागी केले आहे. यामध्ये कोरोनामुक्त रूग्णांचा प्लाझ्मा काढून कोरोनाग्रस्त रूग्णांना दिला जातो. एका दात्याचा प्लाझ्मा दोन रूग्णांना उपयोगी पडून रूग्णांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी केले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Admit only critically ill patients to DCH: Collector Dr. Chaudhary. Instructions to the team regarding investigation