विशेष सरकारी वकिलांनी न्यायालयात केली "ही' विनंती 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

सोन्याचे दागिने लुटण्यासाठी 8 जून 2019 रोजी डोक्‍यात हातोडी मारून राजेश ऍड. कांबळे यांचा खून केला होता. दोन दिवसांनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सत्तूर आणून पाच तुकडे केले होते.

सोलापूर : ऍड. राजेश कांबळे खून खटल्यातील आरोपपत्रामध्ये काही बदल करावेत अशा विनंतीचा अर्ज विशेष सरकारी वकील उज्जल निकम यांनी मंगळवारी सोलापूर जिल्हा न्यायालयात सादर केला आहे. या खटल्यात ते पहिल्यांदाच सोलापूर जिल्हा न्यायालयात हजर झाले. 

न्यायालयाने मागविले आरोपीचे म्हणणे
ऍड. राजेश कांबळे यांचे कुटुंबीय आणि बार असोसिएशनच्या मागणीवरून या खून खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या खटल्यात हजर होण्यासाठी विशेष सरकारी वकील निकम हे मंगळवारी (ता. 10) सकाळी जिल्हा न्यायालयात आले. या खटल्यात आरोपींवर आधीच आरोप निश्‍चित केले आहेत, त्यात काही बदल करावेत अशा विनंतीचा अर्ज ऍड. निकम यांनी न्यायालयाकडे केला आहे. यावर न्यायालयाने आरोपीचे म्हणणे मागविले आहे. 

हेही वाचा : सोलापुरात 'या' रस्त्यांवर वाटते महिलांना भीती!

अद्याप आपला वकील दिला नाही
दरम्यान, या खटल्यात आरोपी बंटी खरटमल याने अद्याप आपला वकील दिला नाही. न्यायालयाकडून कायदेशीर वकील तो घेत नाही. त्याला वकील देण्यासाठी मुदत द्यावी असेही ऍड. निकम यांनी सुचविले आहे. आरोपीच्या वकिलांकडून सीसीटीव्ही फुटेजची मागणी न्यायालयाकडे केली आहे. खटल्याची पुढील तारीख 21 डिसेंबर 2019 आहे. या खटल्यात मूळ फिर्यादीतर्फे ऍड. मिलिंद थोबडे, ऍड. विनोद सूर्यवंशी हे काम पाहत आहेत. तर आरोपी ऍड. सुरेश चव्हाणतर्फे ऍड. नामदेव चव्हाण हे काम पाहत आहेत. 

मृतदेहाचे केले होते तुकडे
सोन्याचे दागिने लुटण्यासाठी 8 जून 2019 रोजी डोक्‍यात हातोडी मारून ऍड. कांबळे यांचा खून केला होता. दोन दिवसांनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सत्तूर आणून पाच तुकडे केले होते. मृतदेहाचे तुकडे विल्हेवाट लावण्यासाठी पिशवीत भरून नेण्यात येणार होते, मात्र त्यापूर्वीच पोलिस घटनास्थळी पोचले होते. खुनानंतर ऍड. कांबळे यांचे सोन्याचे दागिने काढून घेण्यात आले होते. या खून प्रकरणात बंटी खरटमल, मुख्य सूत्रधार ऍड. सुरेश तारू चव्हाण, सराफ श्रीनिवास येलदी या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. सराफ येलदी यास उच्च न्यायालयात जामीन मंजूर झाला असून खरटमल आणि ऍड. चव्हाण हे दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत.

हेही वाचा : जाणून घ्या! काय होऊ शकतात हैदराबाद एन्काउंटरचे परिणाम

ही केली न्यायालयाकडे मागणी.. 
बंटी खरटमल आणि ऍड. सुरेश चव्हाण या दोघांवर खुनाचा कट केल्याचा आरोप ठेवण्यात यावा. कटानुसार बंटी आणि ऍड. चव्हाण याने खून केल्याचा आरोप ठेवावा. दोघांनी मिळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला तसेच सोने विकत येणाऱ्या श्रीनिवास येलदी याच्यावर दागिने विकत घेतल्याचा आरोप ठेवावा अशी मागणी ऍड. उज्ज्वल निकम यांनी केली आहे.

ऍड. राजेश कांबळे खून खटल्यात काही आरोप प्रस्तावित करावेत अशी विनंती न्यायालयाकडे अर्जाद्वारे केली आहे. यापूर्वी पंढरपुरातील धुळा कोळेकर याने तिघा पोलिसांना ठार केले होते, त्या खटल्यात मी आलो होतो. तसेच पंढरपुरातीलच नगराध्यक्ष पवार यांचा खून झाला होता त्याही प्रकरणात मी आलो होतो. सोलापूर शहरातील खटल्यात मी पहिल्यांदाच येत आहे. 
- उज्ज्वल निकम, 
विशेष सरकारी वकील 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Advocate Ujjwal Nikam appeared in Solapur court