मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर ' यांनी ' घेतली उदयनराजेंच्या विरोधात माघार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

आज (सोमवार, ता. सात) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती.

सातारा : सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम जाधव यांनी भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरला होता. आज (सोमवार, ता. सात) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती.

याबरोबरच वाई विधानसभा मतदारसंघात देखील जाधव यांनी आमदार मकरंद पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी), माजी आमदार मदन भोसले (भाजप) यांच्या विरोधात अर्ज भरला होता. 

या मतदारसंघात विद्यमान आमदार मकरंद पाटील आणि माजी आमदार मदन भोसले या दोघांतच नेहमी निकराची लढत होत असते. मदन भोसले हे पूर्वी कॉंग्रेस पक्षात होते. त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या वेळीही दोन्ही उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करून अर्ज भरले होते. तसेच गतवेळी सेनेकडून निवडणूक लढविलेल्या पुरुषोत्तम जाधव यांनी ही आव्हान उभे केले होते. आज (सोमवार) उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दुपारी तीनपर्यंतची वेळ होती.

पुरुषोत्तम जाधव यांनी लोकसभा पोटनिवडणुकीतील तसेच वाई विधानसभा मतदारसंघातील अर्ज मागे घ्यावा यासाठी खूद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले. फडणवीस यांनी जाधव यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून चर्चा केली. या चर्चेनंतर जाधव यांनी दोन्ही उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. याबाबत जाधव यांच्या निकटवर्तीयांनी माहिती दिली.
  
यामुळे वाई विधानसभा मतदारसंघात आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार मकरंद पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माजी आमदार मदन भोसले यांच्यातच चूरशीची लढत होणार हे निश्‍चित झाले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After calling on the Chief Minister, he withdrew his candidature against Udayanraje