अखेर आठ दिवसांनी फळ मार्केटमधीला कचरा उचलला

घनश्‍याम नवाथे 
Saturday, 8 August 2020

विष्णूअण्णा पाटील फळमार्केटमध्ये आठ दिवसापासून कचरा उठाव ठप्प झाल्याने आरोग्यास धोका निर्माण झाला होता. व्यापाऱ्यांनी सोशल मिडियावर फोटो "शेअर' केले होते.

सांगली : येथील विष्णूअण्णा पाटील फळमार्केटमध्ये आठ दिवसापासून कचरा उठाव ठप्प झाल्याने आरोग्यास धोका निर्माण झाला होता. व्यापाऱ्यांनी सोशल मिडियावर फोटो "शेअर' केले होते. "सकाळ' ने देखील याबाबत वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत आज ठेकेदाराने तात्काळ कचरा संकलनास प्रारंभ केला. 

फळ मार्केटमध्ये रोज शेकडो टन फळाची आवक होते. वाहतूक व्यवस्थेत तसेच इतर कारणांनी बऱ्याचदा फळे खराब होतात. अशी फळे व्यापारी त्यांच्या दुकानासमोर ढीग लावून ठेवतात. रोज प्रत्येक दुकानासमोर अशा प्रकारे फळांचा कचरा पडलेला असतो. तो संकलित करण्यासाठी बाजार समितीमार्फत लाखो रूपयांना ठेका दिला जातो. परंतू ठेकेदाराकडून अशी कुजलेली फळे व भाजीपाला वेळेवर संकलित होत नसल्याच्या तक्रारी आहेत. 

सध्या पावसात कुजलेल्या फळांमुळे दुर्गंधी पसरते. आठ दिवसापासून कचरा उठाव ठप्प झाल्यामुळे कुजलेल्या फळांची दुर्गंधी पसरली होती. माशा घोंघावत होत्या. डासांचे प्रमाण देखील वाढले होते. त्यामुळे काही जागृत व्यापाऱ्यांनी साचलेल्या फळांचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले होते. "सकाळ' नेही वृत्त प्रसिद्ध केले. कचरा उठाव ठप्प असल्याबाबत व्यापाऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत आज ठेकेदारास समज दिली. त्यानंतर तत्काळ कचरा संकलनास प्रारंभ झाला. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After eight days the fruit market started picking up trash