लॉकडाऊननंतर खाऊगल्ल्या वाढल्या; चरितार्थाचा "नवा स्टार्टअप' 

लॉकडाऊननंतर खाऊगल्ल्या वाढल्या; चरितार्थाचा "नवा स्टार्टअप' 

मिरज : कोरोना लॉकडाऊननंतर रिकामे हात, पोट आणि डोक्‍यांनी अनेक पर्याय शोधून आपला चरितार्थ कसाबसा चालवला खरा पण त्यातून गल्ली बोळात आता खाऊगल्ल्याही नव्याने तयार झाल्या. कोरोनामुळे बेरोजगार झालेल्यांनी सुरू केलेल्या या "नव्या स्टार्टअप'ने आता खाद्य व्यवसायात आपले मजबूत अस्तित्व निर्माण केले आहे. 

रिकाम्या हातांनी अतिशय चांगल्या पद्धतीने निवडलेला हा चविष्ट पर्याय खवय्यांसाठी पर्वणी ठरला आहे. रस्तोरस्तीचे हे स्वस्त आणि चविष्ट खाद्यपदार्थ उत्कृष्ट चव आणि विश्वासार्हतेमुळे प्रतिष्ठितानांही भुरळ घालत आहेत. केवळ सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात हा व्यवसाय करणाऱ्यांची अधिकृत संख्या किमान दहा हजारांच्या घरात आहे. याशिवाय नोंदणी नसलेले आणि घरगुती व्यवसाय करणाऱ्यांची संख्याही तेवढीच असल्याने या सर्व मंडळींना आता अन्न प्रशासन आणि महापालिकेने सकारात्मकपणे हाताळण्याची गरज आहे. 

मुळातच खवय्यांची वाढती संख्या, वाढत्या आवडीनिवडी चकचकीत, झगमगीत हॉटेल्समधील महागाने मिळणारे खाद्यपदार्थ याला पर्याय म्हणून खाऊगल्ल्यांचा पर्याय पुढे आला. रस्त्यावरील या खाद्यसंस्कृतीलाही मोठा इतिहास आहे. सांगली-मिरजेत शेकडो वर्षांची परंपरा असलेले अनेक खाद्यपदार्थ विक्रेते आहेत. यामधील काही मंडळीचा लौकिक तर सातासमुद्रापार पोहोचला आहे.

रस्त्यावरील या मंडळीचे गाडे ही त्या परिसराची ओळख बनली आहे. याच मंडळींकडे भजी, भेळ वडापाव, बिर्याणी, मालवणीपासून ते चायनीजपर्यंतचे सगळे देशी-विदेशी पदार्थ हे सहजगत्या रस्त्यांवर उपलब्ध होऊ लागले; पण मध्यंतरीच्या कोरोना लॉकडाऊनंतर हजारो किरकोळ नोकरदारांच्या नोकऱ्या गेल्यामुळे याच खाद्यपदार्थ विकणाऱ्यांची संख्या हजारोंच्या पटीने वाढली. हे सगळे नवखे असले तरी त्यांच्या हातच्या चवीलाही खवय्यांनी दाद देऊन त्यांचे नवे व्यवसाय स्थिरस्थावर होण्यास चांगली मदत केली आहे. 

येथेही माफियागिरी 
शहरातील मोक्‍याच्या जागा बळकावून तेथे आपल्या हातगाड्या लावणारे काही माफियाही याच क्षेत्रात आता नव्याने तयार झाले आहेत. मोक्‍याच्या जागा हेरून तेथे गाडी लावण्यासाठी या माफियांनी आपले साम्राज्य निर्माण केले आहे. हीच माफियागिरी नव्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना त्रासदायक ठरते आहे. 

व्यावसायिकांमुळे अर्थकारणही वाढले
रस्त्यावरच्या या व्यावसायिकांमुळे अर्थकारणही वाढले आहे. पण आता गरज आहे ती याच मंडळीना स्वच्छता, आरोग्य, आर्थिक नियोजनाच्या प्रशिक्षणाची. अन्न प्रशासनाकडुन याबाबतची नौटंकी कधीतरी केली जाते. महापालिकेत तर पैसा आणि फुकट खाणाऱ्यांना अंगावर घ्यावे लागते. त्यामुळे हे झंजटच नको म्हणुन नवखे व्यावसायिक परवान्याचा नाद सोडतात. त्यामुळे सरकारचा महसूल बुडतोच, शिवाय व्यवसाय करणाऱ्यालाही जबाबदारीची जाणीव रहात नाही. 
- अमर चौगुले, परवानाधारक खाद्यपदार्थ विक्रेता, मिरज 

शिस्त लावण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न

सांगली मिरज आणि कुपवाड परिसरातील रस्त्यावरील सर्व खाद्यपदार्थ विक्रेत्यांना फेरीवाला धोरणाप्रमाणे शिस्त लावण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. मार्चनंतर यासाठीचे नियोजन सुरू होईल. त्याला रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी प्रतिसाद देणे अपेक्षित आहे. 
- नितीन कापडणीस, महापालिका आयुक्त 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com