Vidhan Sabha 2019 उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर ' यांची ' कोरेगावातून माघार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

आज (सोमवार, ता. सात)  उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस हाेता.

सातारा : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी (ता. सहा) मुंबईत भेट घेतलेल्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे नेते रणजिंतसिंह भोसले यांनी आज (सोमवार, ता. सात) कोरेगावमधील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे कोरेगाव मतदारसंघात आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे आणि शिवसेनेचे उमेदवार महेश शिंदे यांच्यातच निकराची लढत होईल असे चित्र आहे.

कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आज (सोमवार, ता. सात) अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेचे नेते रणजितसिंह भोसले यांच्यासह प्रिया महेश शिंदे, वैशाली शशिकांत शिंदे, संतोष भिसे, प्रदीप मधुकर पवार यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. या मतदारसंघात विद्यमान आमदार शशिकांत शिंदे हे दोन वेळा निवडून आले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी महेश शिंदे यांनी भाजपच्या माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढला आहे. जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला. महेश शिंदे यांनी सेनेत उडी मारून उमेदवारी अर्ज भरला आहे. यामुळे नाराज झालेल्या सेनेचे नेते रणजितसिंह भोसले यांनीही उमेदवारी अर्ज भरला होता.

रविवारी (ता. सहा) उद्धव ठाकरे यांनी भोसले यांना "मातोश्री ' या मुंबईतील निवासस्थानी बोलावून घेतले होते. ठाकरे यांच्या पूढे भोसले यांनी सर्व व्यथा मांडल्या. त्यावेळी भोसले यांच्या कोरेगाव विधानसभा क्षेत्रातील कार्याचे कौतुक ही जाले. त्यावेळी मी पक्षाशी एकनिष्ठ आहे व कायम राहीन असे अभिवचन भोसले यांना ठाकरे यांना दिले.
 
आज (सोमवार, ता. सात) भोसले यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. दरम्यान या मतदारसंघात आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शशिकांत शिंदे. शिवसेनेचे महेश शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब चव्हाण, बहुजन समाज पक्षाचे किरण सावंत तसेच अपक्ष म्हणून प्रिया नाईक, महेश गुलाब शिंदे, शशिकांत जगन्नाथ शिंदे असे एकूण सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After meeting Uddhav Thackeray he took back his election form