महापालिका नाट्यानंतर आता झेडपीत 'अविश्‍वास'च्या हालचाली 

After the municipal drama, now the movement of 'disbelief' in Zedpit
After the municipal drama, now the movement of 'disbelief' in Zedpit

सांगली : महापालिकेतील स्पष्ट बहुमताची सत्ता हातातून गेल्यानंतर  भाजप प्रचंड सावध भूमिकेत आहे. जिल्हा परिषदेत बदल करण्याचा थेट विचारही आता नेते करायला तयार नाहीत. त्यामुळे येथील भाजपचा बदलासाठी आग्रही गट नाराज झाली असून येथे अविश्‍वास ठरावाचा प्रयोग केला जाण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यासाठी भाजप सदस्यांनीच पुढाकार घ्यावा, यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काहीवेळ प्रतिक्षा करण्याच्या मूडमध्ये आहे. त्यामुळे महापालिकेनंतर जिल्हा परिषदेत नाट्यमय घडामोडींना सुरवात झाली आहे. 

जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती बदलासाठी भाजपमधील मोठा गट आग्रही आहे. 24 पैकी 17 सदस्यांना बदलाला हिरवा कंदील दाखवला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन तशी मागणी केली आहे. परंतू, जिल्हा परिषदेत भाजपचे स्पष्ट बहुमत नाही. 

काठावरची आणि कुबड्यांची सत्ता आहे. या कुबड्यांत शिवसेना, अजितराव घोरपडे गट आणि रयत आघाडीचा समावेश आहे. ही मंडळी कधीही पलटी खावू शकतात, याची भाजपला धास्ती आहे. त्यामुळे हात दाखवून अवलक्षण करून घेण्याची मानसिकता भाजप नेतृत्व दाखवणार नाही. आधी मिरज पंचायत समितीत उपसभापती निवडीत भाजपला दणका बसला. तेथे कॉंग्रेसने भाजपचे दोन सदस्य फोडले. महापालिकेत महापौर निवडीत भाजपचे सात नगरसेवक फुटले. परिणामी, दोन्ही ठिकाणी सत्ता असून तोंडावर पडण्याची वेळ आली. आता जिल्हा परिषदेची त्यात भर पडली तर जिल्ह्यातील प्रमुख सत्ताकेंद्र म्हणून उरली सुरली सत्ता अडचणीत येऊ शकते. 

भाजप बदलाला अनुकुल नसेल तर पक्षातील नाराज आणि विरोधकांची गट्टी जमण्याची भिती आहेच. त्यादृष्टीने काहींनी हालचाली सुरु केल्या आहेत. येथे अध्यक्षांवर अविश्‍वास ठराव आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यासाठी भाजपमधील फुटीर, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, घोरपडे गट, रयतचे दोन सदस्य आणि स्वाभिमानी अशी भट्टी जमवली जाऊ शकते. तसे झाल्यास सत्ता अडचणीत येऊ शकते. 

45 सदस्यांची गरज... 
जिल्हा परिषदेत अविश्‍वास ठराव आणायचा झाल्यास त्या बाजूने 45 सदस्यांची गरज लागेल. येथे सध्या 59 सदस्य आहेत. महिला अध्यक्ष असल्याने दोन तृतियांश बहुमताची गरज लागेल. हे गणित जमवायचे झाल्यास भाजपच्या किमान 15 जणांनी बंड करणे गरजेचे आहे. महापालिकेतील सत्ता काळात अडीच वर्षांचा मोठा वेळ आहे. त्यामुळे राष्ट्रवादी, कॉंग्रेसने ताकद लावून सत्ता खेचून घेतली. जिल्हा परिषदेत तशी स्थिती नाही. येथे केवळ एक वर्षाचा वेळ आहे. त्यानंतर निवडणुका होतील. त्यामुळे राष्ट्रवादी, कॉंग्रेस सत्ता पालट करण्यासाठी आग्रही राहतील का ?, याबाबत उत्सुकता असेल. 

जिल्हा परिषदेत अविश्‍वास ठराव येणार असेल तर कॉंग्रेस साथ देईल. इथला कारभार संथ झाला आहे. तो गतीमान केला पाहिजे. त्यासाठी बदल गरजेचा आहे. 
- जितेंद्र पाटील, पक्षप्रतोद, कॉंग्रेस


संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com