मेळाव्यानंतर राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची धक्काबुक्की

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

नगर : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थित झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यानंतर आज (शनिवारी) दुपारी दोन गटांत जुंपली. एकमेकांना धक्काबुक्की केल्यानंतर दोन्ही गट थेट पोलिस ठाण्यात गेले. मात्र, वरिष्ठ नेत्यांनी कानपिचक्‍या दिल्यानंतर त्यांच्यात समेट झाला आणि ते तक्रार न देताच निघून गेले.

नगर : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थित झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यानंतर आज (शनिवारी) दुपारी दोन गटांत जुंपली. एकमेकांना धक्काबुक्की केल्यानंतर दोन्ही गट थेट पोलिस ठाण्यात गेले. मात्र, वरिष्ठ नेत्यांनी कानपिचक्‍या दिल्यानंतर त्यांच्यात समेट झाला आणि ते तक्रार न देताच निघून गेले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा मेळावा आज दुपारी टिळक रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात झाला. मेळावा संपल्यानंतर ज्येष्ठ नेते वाहनात बसून सावेडीच्या दिशेने निघून गेले. त्या वेळी त्यांच्या वाहनाजवळ उभे असलेले पक्षाचे दोन युवा पदाधिकाऱ्यांमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. त्यात एका माजी आमदाराच्या पुतण्यालाही धक्काबुक्‍की झाली. त्यानंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांचे समर्थक आमने-सामने आले.

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत एका पदाधिकाऱ्याला बाजूला घेतले. पोलिसांचा गराडा असतानाही त्या पदाधिकाऱ्यावर दुसऱ्या गटातील एकाने चप्पल भिरकावली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

दरम्यान, या घटनेनंतर महापालिकेतील राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी तथा युवा नेत्याने थेट पोलिस ठाणे गाठले. तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू केली. त्यानंतर काही वेळाने दुसरा पदाधिकारीही कार्यकर्त्यांसह तेथे पोचला. त्यांनीही तक्रार देण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेतेही ठाण्यात पोचले. त्यांची ठाण्यातच बैठक झाली. नेत्यांच्या कानपिचक्‍यानंतर दोघांमध्ये समेट झाला. टाइप केलेल्या तक्रारीवर सही न करताच ते दोघे निघून गेले.

दोन्ही बाजूंचे लोक तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आले होते. मात्र, त्यांच्यात आपसांत चर्चा झाल्यानंतर ते तक्रार न देता निघून गेले.
- विकास वाघ, पोलिस निरीक्षक

कार्यकर्त्यांच्या गैरसमजुतीतून तो प्रकार घडला होता. आमच्यातील गैरसमज दूर झाल्याने प्रकरण मिटले आहे.
- सुरेश बनसोडे, 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After the rally, fight among the office bearers of NCP