esakal | पाच महिने थांबलेली लालपरी जिल्ह्याबाहेर धावू लागली
sakal

बोलून बातमी शोधा

After running for five months, they started running outside the district

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउनमुळे पाच महिने जिल्ह्यातच थांबलेल्या बसेस आजपासून जिल्ह्याबाहेर धावू लागल्या.

पाच महिने थांबलेली लालपरी जिल्ह्याबाहेर धावू लागली

sakal_logo
By
उल्हास देवळेकर

सांगली : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउनमुळे पाच महिने जिल्ह्यातच थांबलेल्या बसेस आजपासून जिल्ह्याबाहेर धावू लागल्या. आज पहिल्याच दिवशी सकाळपासून सायंकाळपर्यंत 46 गाड्यांनी 71 फेऱ्यातून प्रवासी वाहतूक केली. सांगली ते कोल्हापूर, इचलकरंजी, कराड, सांगोला आदी मार्गावर जिल्ह्यातील गाड्या धावल्या. ई-पासची सक्ती नसल्यामुळे तसेच नियमित प्रवासी दरामुळे अनेक प्रवाशांनी लाभ घेतला. सांगली-मिरज आगारातील शिवशाही गाडी शुक्रवारपासून धावणार आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर 23 मार्चपासून एस. टी. बसेस वाहतूक बंद होती. त्यानंतर साखर कारखान्यांचा हंगाम संपल्यानंतर मजूर वाहतूक करण्यासाठी तसेच परप्रांतातीय मजूर, विद्यार्थी आदींना सोडण्यासाठी एसटी राज्याबाहेरही धावली होती. 22 मे पासून जिल्हांतर्गत एस. टी. बसेस धावू लागल्या आहेत. बसमधून माल वाहतूक देखील सुरू आहे. आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक सुरू होण्याची अनेक प्रवाशांना प्रतिक्षा होती. अखेर बुधवारी परिवहन मंत्री अनिल परब यांनी आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीची घोषणा केल्यानंतर अनेकांनी स्वागत केले. 

आज सकाळपासून प्रवाशांना उत्सुकता होती. त्यानुसार सकाळी सहापासून एसटीच्या विविध आगारातून आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीस प्रारंभ झाला. सांगलीतून कोल्हापूर, इचलकरंजी, कराड, सांगोला आदी मार्गावर प्रत्येक तासाला एक बस याप्रमाणे नियोजन केले होते. जिल्ह्याबाहेर प्रवासासाठी ई-पासची सक्ती नव्हती. त्यामुळे गेले काही दिवस कामासाठी परजिल्ह्यात जाण्यास उत्सुक असलेल्या अनेकांनी स्थानकांवर गर्दी केली होती. प्रत्येक आसनावर एक प्रवासी याप्रमाणे व्यवस्था केली होती. तसेच तिकिटदर देखील नियमितच होता. त्यामुळे दिवसभरात शेकडो प्रवाशांनी आरामदायी प्रवास केला. 

दिवसभरात सकाळी सहा ते सायंकाळी सातपर्यंत 46 गाड्यांनी विविध मार्गावर 71 फेऱ्या पूर्ण केल्या. कोल्हापूर, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात एसटी आज धावली. शुक्रवारपासून शिवशाही गाडी पुणे मार्गावर सोडण्यात येणार आहे. प्रवाशांची मागणी आणि संख्या लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने फेऱ्यांची संख्या वाढवली जाणार आहे. 


दर दोन तासाला शिवशाही 
सांगली-पुणे मार्गावर शुक्रवारपासून दर दोन तासाला शिवशाही गाडी सोडण्यात येणार आहे. प्रत्येक आसनावर एकच प्रवासी याप्रमाणे 21 प्रवासीच भरले जाणार आहेत. तसेच भाडे देखील नियमितपणे आकारले जाणार आहे. 

संपादन : प्रफुल्ल सुतार

loading image
go to top