तब्बल सात महिन्यानंतर आटपाडी आज शेळ्यामेंढ्यांचा बाजार

नागेश गायकवाड 
Saturday, 24 October 2020

पश्‍चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध येथील शेळ्या-मेंढ्यांचा आठवडा बाजार तब्बल सात महिन्यानंतर उद्या (ता. 24) पासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पुन्हा सुरू होणार आहे. या बाजारामुळे आर्थिक उलाढाल आणि व्यवहारचक्राला गती मिळणार आहे.

आटपाडी : पश्‍चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध येथील शेळ्या-मेंढ्यांचा आठवडा बाजार तब्बल सात महिन्यानंतर उद्या (ता. 24) पासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पुन्हा सुरू होणार आहे. या बाजारामुळे आर्थिक उलाढाल आणि व्यवहारचक्राला गती मिळणार आहे. 

आटपाडीतील शेळ्या-मेंढ्याचा बाजार सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. आटपाडीतील बोकडाचे मटणही प्रसिद्ध आहे. आठवडा बाजारात दर आठवड्याला 100 वर पिकप गाड्या भरून बकरे आणि मेंढ्या बाहेर जातात. खरेदीसाठी सांगली, कोल्हापूर आणि गोव्याहून अनेक मोठे व्यापारी येतात. विक्रीसाठी आटपाडी, माण, खटाव, सांगोला तालुक्‍यातील शेतकरी शेळ्या-मेंढ्या आणि बकरे घेऊन येतात. 

शेळ्या-मेंढ्यांसाठी आटपाडीचा बाजार प्रसिद्ध आहे. बाजारात वर्षाला दोनशे ते अडीचशे कोटी रुपयांच्या दरम्यान उलाढाल होते. मात्र 22 मार्चपासून कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर केल्यापासून शेळ्या-मेंढ्यांचा बाजार बंद होता. तब्बल सात महिन्यानंतर बाजार सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिल्याची माहिती सभापती भाऊसो गायकवाड यांनी दिली. 

उद्या (ता.24) सकाळी आठ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बाजार भरणार आहे. त्यानंतर करगणी येथे दर गुरुवारी भरणारा बाजारही सुरू केला जाणार आहे. सोशल डिस्टन्सचे पालन करून बाजार भरवला जाणारा आहे. विना मास्क येणाऱ्या आणि धूम्रपान करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा बाजार समितीने दिला आहे.

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After seven months, Atpadi is today a sheep and goat market