सांगलीत दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर एसटी धावली...परंतु

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

तब्बल दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर एसटी बसेस आजपासून सांगलीत धावू लागल्या. परंतु प्रवासी नसल्यामुळे अनेक ठिकाणी जवळपास रिकाम्या बसेसच पळवाव्या लागल्या.

सांगली : तब्बल दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर एसटी बसेस आजपासून जिल्ह्यात धावू लागल्या. परंतु प्रवासी नसल्यामुळे अनेक ठिकाणी जवळपास रिकाम्या बसेसच पळवाव्या लागल्या. पहिला दिवस असल्यामुळे कशीबशी एसटी धावली.

"कोरोना' चा प्रादुर्भाव आढळल्यानंतर 14 मार्चपासून फेऱ्या कमी करत आणल्या. तर 24 मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर पूर्णपणे एसटी बसेस सेवा बंद करण्यात आली. भारमान वाढवा अभियान सुरू असतानाच एसटीचे चाक थांबल्यामुळे प्रचंड नुकसान झाले. काही दिवसांपूर्वी ऊसतोड मजुरांसाठी त्यानंतर परप्रांतीय मजुरांना घेऊन एसटी धावली. तर आजपासून एसटी धावणार असल्यामुळे प्रवाशांचा कितपत प्रतिसाद मिळतो याकडे लक्ष होते. 

जिल्ह्यातील दहा आगारांत कोठून-कोठे एसटी धावणार याचे वेळापत्रक निश्‍चित केले होते. परंतु प्रवाशांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. "कोरोना' चा प्रसार रोखला जावा यासाठी प्रत्येक सीटवर एकच प्रवासी याप्रमाणे निम्म्या आसन क्षमतेने एसटी बस धावेल असे जाहीर केले होते. परंतु 22 प्रवासी देखील भरले गेले नाहीत असे चित्र प्रत्येक आगारातील बसेसमध्ये दिसून आले. दोन-चार प्रवासी असले तरी आज पहिला दिवस असल्यामुळे एसटी बस धावली. मास्क असेल तरच प्रवास करा असे वाहक सांगताना दिसले. 

आजपासून एसटी बसेस सुरू झाल्याचा संदेश सर्वत्र पोहोचला आहे. त्यामुळे प्रत्येक आगाराला आता प्रवाशांची प्रतीक्षा लागून राहिली आहे. तसेच प्रवासी संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी प्रत्येक आगारातील कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. ज्या मार्गावर प्रवासी असतील तेथे बस नेल्या जातील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After waiting for two months in bus ran in Sangli

टॅग्स
टॉपिकस