
करगणी (ता. आटपाडी) येथील जिल्हा परिषद शाळा नंबर दोन मधील शिक्षक एक वर्षानंतर शाळेकडे फिरकले.
आटपाडी : करगणी (ता. आटपाडी) येथील जिल्हा परिषद शाळा नंबर दोन मधील शिक्षक एक वर्षानंतर शाळेकडे फिरकले. त्यांना हजर करून घेण्यास शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी विरोध केला आहे. यासंबंधी युवा सेनेचे अध्यक्ष रमेश माने यांच्यासह ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
करगणी येथील जिल्हा परिषद शाळा नंबर दोन पहिली ते सातवीपर्यंत आहे. या शाळेवर माधवनगर येथील उपशिक्षक गणेश गोसावी बदली होऊन 1 जुलै 2019 रोजी हजर झाले. पहिले पाच महिने त्यांच्या सवडीने विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले. यानंतर 1 डिसेंबर पासून त्यांनी रामरामच ठोकला. यासंबंधी ग्रामपंचायत, शालेय व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांच्या अनेक वेळा भेटी घेऊन गाऱ्हाणे मांडले, निवेदने दिली. तरीही ते हजर झाले नाहीत.
दरम्यान, कोरोनाच्या काळात वर्ग बंद असले तरी शाळा सुरू होत्या तरीही ते फिरकले नाहीत. त्यांनी ऑनलाइन तासही सुरु केले नाहीत. तब्बल एक वर्षानंतर हे ते हजर झाले. त्यांना शाळेवर हजर करून घेण्यात ग्रामस्थांनी विरोध करून माघारी पाठवले. एक वर्ष दांडी मारल्या बद्दल त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. शाळेवर हजर झाल्यास आंदोलनाचा इशारा युवा सेनेचे रमेश माने यांच्यासह ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. यासंबंधी गट शिक्षण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता अनेकवेळा प्रयत्न केला मात्र संपर्क झाला नाही.
गणेश गोसावी हे शिक्षक एक वर्ष गैरहजर होते. त्यांच्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. आमच्या गावातील विद्यार्थ्यांचे नुकसान करणाऱ्या शिक्षकाला आम्ही हजर होऊ देणार नाही.
- रमेश माने, करगणी शाखा अध्यक्ष, युवा सेना
संपादन : प्रफुल्ल सुतार