esakal | शाहीनबाग आंदोलक म्हणतात- त्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये 

बोलून बातमी शोधा

Agitators protesting against the law in Delhi taken meeting in Miraj

घटनेला वाचवण्यासाठी संघर्ष करत आहे. त्यामुळे एनआरसी, एनपीआरचे नाटक बंद करा असे आवाहन शाहीनबागच्या आंदोलनाच्या नेत्यांनी आज येथे केले.

शाहीनबाग आंदोलक म्हणतात- त्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली : अशफाक उल्ला खान, भगतसिंगांच्या वारसदारांना सावरकरांच्या वारसदारांनी देशभक्ती शिकवू नये. सीएए, एनआरसी, एनपीआरच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे. घटनेला वाचवण्यासाठी संघर्ष करत आहे. त्यामुळे एनआरसी, एनपीआरचे नाटक बंद करा असे आवाहन शाहीनबागच्या आंदोलनाच्या नेत्यांनी आज येथे केले.

सीएए, एनआरसीला विरोध करण्यासाठी स्टेशन चौकात सुरु असलेल्या वसंतबाग आंदोलनाचा आज 34 वा दिवस होता. दिल्लीत शाहीनबागमध्ये या कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या अमृता पाठक, हसीना अहमद, स्वाती खन्ना यांच्यासह टी. एम. जियाउलहक यांची येथे सभा झाली. 

जेएनयुची विद्यार्थिनी असलेल्या अमृता पाठक म्हणाल्या, ""देशाची स्थिती लपून राहिली नाही. या कायद्याविरोधात केवळ मुस्लिम नव्हे तर पुर्ण हिंदुस्थान रस्त्यावर उतरला आहे. सरकारला स्वस्थ बसू देणार नाही. अहमदाबादमध्ये गरिबी झाकण्यासाठी भिंत बांधण्यात येत आहे, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. एनआरसी, सीएएचं काय करायचे, हे जनता ठरवणार. आता सरकारची एनआरसी, सीएए, एनपीआर करुन त्यांना देशाबाहेर घालवणार. हे नाटक देशात चालणार नाही. आम्हाला देशभक्ती शिकवू नये. सुशिक्षितांचे यांना वावडे आहे. वाढती बेरोजगारी, महिलांवरील वाढते अत्याचार यांचे उत्तर द्या; मग एनपीआर, एनआरसी मागा. कपड्यांवरुन लोक ओळखता तर महिलांवर अत्याचार केलेल्या बाबांना का नाही ओळखले? असा सवाल त्यांनी केला. 

महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आम्ही आहोत. यांना न मानणाऱ्यांना जमीनदोस्त करु. दक्षिण आफ्रिकेत एनआरसी विरोधात आंदोलन करणाऱ्या महात्मा गांधींचे आम्ही वारसदार आहोत. तर देशात हिटलरचे वारस त्यांची चाल खेळत आहेत, असे त्या म्हणाल्या. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांना व्यक्ती म्हणून विरोध नाही. ते भेटायला आले तर त्यांना चहा देऊ; पण त्यांच्या धोरणांना विरोध आहे. ते आपल्याला देशद्रोही ठरवून स्वत:ला देशभक्त ठरवू पहात आहेत. देशाच्या भविष्यासाठी आपल्याला लढा द्यावा लागेल. आपण त्यांना निवडून देऊ शकतो तर उचलून फेकून देऊ शकतो हे दाखवावे लागेल, असे त्या म्हणाल्या. 

हसिना अहमद यांनी आसाममध्ये एनआरसीवरुन गरिबांवर होत असलेल्या अत्याचाराचा पाढा वाचला. तेथेही हिंदू, मुस्लिम सर्व एकत्र येऊन आंदोलन करत आहेत. सरकारविरोधात बोलणाऱ्यांना जेलमध्ये टाकण्यात येत असल्याचे सांगितले. याविरोधात आणखी आवाज उठवावा लागेल असे आवाहन त्यांनी केले. 
दिल्ली विद्यापीठातील कायद्याची विद्यार्थिनी असलेल्या स्वाती खन्ना म्हणाल्या,

"विद्यापीठातील विद्यार्थ्यांवरील हल्ले जालियानवाला बाग हल्ल्यासारखे होते. तुम्ही जनरल डायरचे वारसदार असाल तर भगतसिंगांचे वारसदार निर्माण होतील. नथूराम गोडसे सांगलीचे होते. त्यामुळे येथे लक्ष ठेवा पुन्हा गोडसे येवू नयेत. गोडसे बनवले तर आम्ही भगतसिंग बनवू. संसदेपेक्षा राज्यघटना मोठी आहे. चुकीच्या पध्दतीने आणलेल्या कायद्याविरोधात सत्याग्रह करणे हा घटनेने दिलेला अधिकार आहे. घुसखोर, शरणार्थी या शब्दांवरुन गोंधळ घालण्याचा प्रयत्न सुरु आहे.'' 

जिया उलहक म्हणाले, ""देशात 1137 ठिकाणी शाहीनबागसारखे आंदोलन सुरु आहे. हिंदू मुस्लिम नाही तर सर्वांनाच नागरिकत्व सिध्द करावे लागणार आहे. दलित, मुस्लिम, मागासांची कागदपत्रे तपासण्यात येतील. त्यांचे आरक्षण रद्द होईल. त्यामुळे घटनेला वाचवण्यासाठी रस्त्यावरचा संघर्ष सुरु आहे.'' 

आयुब बारगीर, अय्याज नायकवडी, उमर गवंडी यांनी आयोजन केले. यावेळी श्रीमती शैलजा पाटील, कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, उमेश देशमुख उपस्थित होते. मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.