जिल्ह्यातील कृषी सेवा दुकानदारांचा तीन दिवस बंद 

 रवींद्र माने 
Thursday, 9 July 2020

तासगाव (सांगली)-  बियाणे न उगवल्याबद्दल दुकानदारांवर गुन्हे दाखल करणे व अन्य मागण्यांबाबत कार्यवाही होत नसल्याने राज्यातील कृषी विक्रेत्यांचा 10 ते 12 जुलैदरम्यान राज्यव्यापी बंद पुकारण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाईड सीड्‌स डीलर्स असोसिएशनचे (माफदा) उपाध्यक्ष बाबुराव जाधव यांनी सांगितले जिल्ह्यातील 6500 कृषी सेवा केंद्र बंद रहाणार आहेत. 

कोणतेही बियाणे उगवले नसल्यासंबंधीच्या शेतकऱ्यांच्या तक्रारीला अनुसरून विक्रेत्याला जबाबदार धरून त्याच्याविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात येऊ नयेत, अशी मागणी राज्याचे कृषी आयुक्त यांना संघटनेकडून 30 जूनला केली आहे. तसेच राज्याचे कृषिमंत्री यांची संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समक्ष भेट घेतली. परंतु शासनस्तरावरून विक्रेत्यांवरील अन्यायकारक कार्यवाही थांबविण्यात आली नाही किंवा रद्द झालेली नाही. वास्तविक हे बियाणे सर्व नियमांचे पालन करून विक्रेते विक्री करत असतात. त्यामुळे विक्रेत्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

याशिवाय विक्रेत्यांकडून तपासणीसाठी बियाणे नमुन्यांची 15 वर्षांची सुमारे 15 कोटीपेक्षा शासनाकडून जादा येणे असलेली रक्कम परत मिळणे, वापराची मुदत संपलेली कीटकनाशके उत्पादक कंपन्यांनी विक्रेत्यांकडून परत जमा करून घेणे, परवाना नूतनीकरणाची रक्कम राज्यांमध्ये एकाच दराने आकारणी करणे, दुकानातील साठा रजिस्टर संगणकीय पद्धतीने ठेवण्यास मान्यता देणे आदी मागण्या कृषी विभागाकडे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या विविध मागण्यांसाठी माफदा ने तीन दिवसांचा बंद पुकारला आहे. या बंदमध्ये जिल्ह्यातील साडेसहा हजार कृषी सेवा केंद्र चालक तर राज्यातली 52 हजार कृषी सेवा केंद्र चालक सहभागी होत असल्याची माहिती उपाध्यक्ष श्री. जाधव यांनी दिली. याबंदनंतर ही मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत बंदचा इशारा ही त्यांनी दिला आहे. 

संपादन : घनशाम नवाथे 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agricultural service shopkeepers in the district closed for three days