जीडीपीमध्ये घरसण होत असताना; कृषी क्षेत्रात 3.4 टक्के विकासदर कायम

विष्णू मोहिते 
Wednesday, 9 September 2020

कोरोना लॉकडाऊन काळामध्ये सर्वच क्षेत्रामध्ये घसरण होत असताना एकट्या कृषी क्षेत्रात 3.4 टक्के विकासदर कायम राखला आहे.

सांगली : कोरोना लॉकडाऊन काळामध्ये सर्वच क्षेत्रामध्ये घसरण होत असताना एकट्या कृषी क्षेत्रात 3.4 टक्के विकासदर कायम राखला आहे. आज मोठ्या प्रमाणावर जीडीपीमध्ये घरसण झाली असतानाही आपला देश आजुनही सक्षम आहे याचे एकमेव कारण कृषीक्षेत्र आहे. याच क्षेत्रात भरीव कामगिरी करुन दाखवण्याची संधी आहे. तरुणांनीही शेतीकडे एक संधी म्हणून पहायला हवे. 

सन 20-21 या आर्थिक वर्षात देशाच्या आर्थिक विकासात शेतीची भूमिका महत्वाची राहणार आहे. कोरोना संकटाचा मोठा फटका देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेला बसणार असला तरी त्याची फारशी झळ शेतीला लागणार नाही. सकल राष्ट्रीय उत्पन्नात 16 टक्के हिस्सा असणारे आणि 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक लोकसंख्येला रोजगार देणारे शेती क्षेत्र आर्थिक संकटात साडलेल्या अर्थव्यवस्थेला तारून नेईल, असा विश्‍वास काही दिवसापूर्वी निती आयोगाने व्यक्त केला होता. 

कोरोना महामारीच्या संकटामुळे जागतिक अर्थव्यवस्था संकटात आली आहे. त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरही होत आहे. परंतु या संकटाच्या काळातही अनेक राज्यांमध्ये शेती क्षेत्राचा विकास दर चांगला राहील आणि शेती देशाच्या विकासात महत्वाची भूमिका पार पाडेल, असे केंद्र सरकारला वाटते. कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक विकासावर मोठा परिणाम होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम शेती क्षेत्रावर होणार नाही. भारतीय अर्थव्यस्थेत शेती क्षेत्राचा हिस्सा 16 टक्के आहे आणि लॉकडाउनध्ये शेती क्षेत्रातील कामे अपवाद वगळता चांगल्या प्रकारे सुरु होती. 2019-20 या आर्थिक वर्षात कृषी आणि संलग्न क्षेत्रातील विकास दर हा 3.7 टक्‍क्‍यांवर होता. सध्याच्या किंमत पातळीवर विचार केल्यास हा दर 11.3 टक्‍क्‍यांवर असून शेतीव्यतिरिक्त क्षेत्रातील विकास दरापेक्षा 60 टक्के अधिक आहे. 

शेतीसाठी सकारात्मक बरेच काही.... 
- गेल्यावर्षीच्या तुलनेत सन 2019-20 मध्ये अन्नधान्य उत्पादनात दोन टक्के वाढ होऊन 298.3 दशलक्ष टन उत्पादन अपेक्षित. खरिपात 149.92 दशलक्ष टन तर रब्बीत 148.4 दशलक्ष टन उत्पादन होणार. 
- पुढीस हंगामात अन्नधान्याव्यतिरिक्त तेलबिया आदी पिकांचे उत्पादन वाढण्याची सरकारला अपेक्षा. 
- लोकांच्या व्यक्तिगत खर्चात झालेल्या कपातीचा शेती उत्पादनांवर परिणाम होणार नाही. 

"सन 1951 पासून भारताच्या विकासाचा इतिहास पाहिल्यास असे पहिल्यांदाच झाले आहे, की शेतीचा विकास दर इतर क्षेत्रांपेक्षा अधिक आहे. भूतकाळात ज्याप्रमाणे संकटाच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेला शेती क्षेत्राने वाचविले त्याचप्रमाणे आताही शेती अर्थव्यवस्थेला तारुन नेईल.' 
- दीपक पाटील, अभ्यासक, शेतकरी, कवलापूर. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agriculture maintains 3.4 per cent growth