नगरकरांनी काल थाळ्या वाजवल्या, आज काठ्या खाल्ल्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प पोलिसांनी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या सुमारे 300 जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली. या कारवाईमुळे पोलिस ठाण्यांत गर्दी झाली होती

नगर : शहरात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या सुमारे 300 जणांविरुद्ध कोतवाली, तोफखाना व भिंगार कॅम्प पोलिसांनी आज दिवसभरात कारवाई केली. 
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काल (रविवारी) देशभर जनता कर्फ्यू पाळण्यात आला. मात्र, आज सकाळी नागरिकांनी नेहमीप्रमाणे दुकाने उघडून कामकाज सुरू केले. अनेक जण कामानिमित्त घराबाहेर पडले. पोलिसांनी त्यांना तत्काळ रस्त्याने विनाकारण फिरण्यास मज्जाव केला.

कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प पोलिसांनी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या सुमारे 300 जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली. या कारवाईमुळे पोलिस ठाण्यांत गर्दी झाली होती. 

तोफखाना पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र पिंगळे, उपनिरीक्षक समाधान सोळंके, कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विकास वाघ, उपनिरीक्षक संतोष शिरसाठ, भिंगार कॅम्पचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी ही कारवाई केली. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. स्वत:च्या सुरक्षेसाठी नियमांचे पालन करा; अन्यथा रस्त्यांवर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. 
- संदीप मिटके, पोलिस उपअधीक्षक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ahmednagar 300 accused in police action