नगर महापालिका कर्मचाऱ्यांचा संप मागे... त्या नगरसेविकेच्या पद रद्दबाबत सोमवारी प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 एप्रिल 2020

 मुख्य आरोपी नीलेश भाकरेसह काही आरोपी अद्यापि फरारी आहेत. त्यांच्या लवकरच मुसक्या आवळल्या जातील, असं अतिरिक्त पोलिस अधीक्षक सागर पाटील यांनी आश्वासन कर्मचाऱ्यांना दिलं. यावेळी डॉ. उपायुक्त प्रदीप पठारे उपस्थित होते.

नगर - महापालिकेच्या फवारणी पथकाला बेदम मारहाण करण्यात आली होती. विशेष म्हणजे मारहाण करणारा आरोपी हा एका नगरसेविकेचा नातेवाईक आहे. कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण झाल्याने त्यांनी गुरूवारपासून संप पुकारला होता. त्यामुळे शहरातील कचरा संकलनासह सर्वच अत्यावश्यक सेवा बंद झाल्या होत्या. परिणामी शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचायला सुरूवात झाली होती.

आरोपींना तात्काळ अटक करावी, काम करताना पोलिस संरक्षण द्यावे आदी मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. कोरोनाच्या काळात महापालिका कर्मचाऱ्यांनी अशी भूमिका घेतल्याने प्रशासनावर ताण आला होता.

कर्मचार्यांना मनाप्रमाणे फवारणी केली नाही म्हणून नीलेश भाकरेने साथीदारांसह महापालिकेच्या कर्माचाऱ्यांना बेदम मारले होते. तो नगरसेविका रिटा भाकरे यांचा नातेवाईक आहे. त्यामुळे कर्मचारी चांगलेच संतापले होते. एका नगरसेविकेचाच नातेवाईक अशा प्रकारे कर्मचाऱ्यांना मारहाण करीत असेल तर आम्ही काय करायचे, अशी कर्मचारी युनियनची भूमिका होती.

भाकरेंचे नगरसेवकपद रद्दसाठी प्रस्ताव

नगरसेविका रिटा भाकरे यांचे नगरसेवकपदच रद्द व्हावे,यासाठी कर्मचारी युनियन आग्रही होती. याबाबत ते अडून बसले होते. त्या संदर्भात आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्यासोबत त्यांची बैठक झाली. त्यात सोमवारपर्यंत तो अहवाल तयार करण्याचे आश्वासन मायकलवार यांनी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांना दिले. सोमवारी तो अहवाल नगर विकास विभागाला पाठविला जाणार आहे.

 मुख्य आरोपी नीलेश भाकरेसह काही आरोपी अद्यापि फरारी आहेत. त्यांच्या लवकरच मुसक्या आवळल्या जातील, असं अतिरिक्त पोलिस अधीक्षक सागर पाटील यांनी आश्वासन कर्मचाऱ्यांना दिलं. यावेळी डॉ. उपायुक्त प्रदीप पठारे उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांची तिसरी मागणीही मान्य करण्यात आली. औषध फवारणी करताना पोलिस संरक्षण दिले जाणार आहे.तसेच औषध फवारणी केवळ दिवसाच केली जाईल, असा तोडगा निघाल्यानंतर शहरात कर्मचार्यांनी आंदोलन मागे घेतले.

कामावर हजर व्हा

महापालिकेने तीनही मागण्यांबाबत आश्वासन दिले आहे. ते पूर्ण करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. आश्वासन मिळाल्याने आम्ही समाधानी आहोत. कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे.

- अनंत लोखंडे, अध्यक्ष महापालिका कामगार युनियन.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ahmednagar municipal staff resumes work