विमान आले मात्र, पाणी नाही आले !

हरिभाऊ दिघे
रविवार, 19 मे 2019

तळेगाव दिघे (नगर ) : दुष्काळी भागातील शिर्डीनजीकच्या काकडी येथे विमानतळ सुरु करण्यात आले. त्यामुळे हा भाग प्रसिद्धीच्या झोतात आला. विमानतळाचे काम सुरु होताच परिसरातील जमिनीचे भाव गगनाला भिडले. मात्र या भागातील पाणीप्रश्न मात्र प्रलंबित राहिला. विमान आले, मात्र पाणी नाही आले ! अशी व्यथा दुष्काळी भागातील शेतकऱ्यांकडून अनुभवयास मिळत आहे

तळेगाव दिघे (नगर ) : दुष्काळी भागातील शिर्डीनजीकच्या काकडी येथे विमानतळ सुरु करण्यात आले. त्यामुळे हा भाग प्रसिद्धीच्या झोतात आला. विमानतळाचे काम सुरु होताच परिसरातील जमिनीचे भाव गगनाला भिडले. मात्र या भागातील पाणीप्रश्न मात्र प्रलंबित राहिला. विमान आले, मात्र पाणी नाही आले ! अशी व्यथा दुष्काळी भागातील शेतकऱ्यांकडून अनुभवयास मिळत आहे.

संगमनेर तालुक्यातील कासारे ( जांभूळवाडी ) गावाच्या सीमेवरील काकडी ( ता. कोपरगाव ) येथे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने ३४० कोटी रुपये खर्च करून खर्च करून विमानतळाचे बांधकाम केले. १ ऑक्टोबर २०१७ ला देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन झाले. शिर्डी पासून अवघ्या चौदा किलोमीटर अंतरावर हे विमानतळ आहे. त्यामुळे साईभक्तांची चांगली सोय झाली. या विमानतळामुळे राष्ट्रीय नेत्यांचा राबता याठिकाणी सुरु असतो. मात्र या भागातील दुष्काळी व अवर्षणप्रवण स्थिती कुणाच्याही नजरेत भरताना दिसत नाही.

काकडी विमानतळामुळे या परिसरातील जमिनीला सोन्याचे मोल मिळू लागले, मात्र या भागातील पाणीप्रश्न आजही प्रलंबित आहे. निळवंडे धरण झाले, काही प्रमाणात कालवे झाले. मात्र निधीअभावी कालव्यांची कामे मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे. काकडी विमानतळा सभोवताली दहा बारा किलो मीटर अंतराच्या आत असणारी संगमनेर तालुक्यातील कासारे, लोहारे, मिरपूर, वडझरी खुर्द, वडझरी बुद्रुक, तळेगाव दिघे, कोपरगाव तालुक्यातील काकडी, रांजणगाव देशमुख, डांगेवाडी, मनेवाडी, मल्हारवाडी, राहता तालुक्यातील केलवड, कोऱ्हाळे, आडगाव ही गावे पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पिण्यालाही नाही, अन् शेतीलाही पाणी नाही, अशी स्थिती या भागात आहे. विमानतळ सुरु झाल्यापासून परिसरातील गावांवरून आकाशातून विमाने जाताना व येताना दिसतात. मात्र पाण्याचा पत्ता नाही. दुष्काळामुळे शेतकऱ्यांना जिवंतपपणीच मरणयातना सोसाव्या लागत आहेत. साहजिकच 'विमान आले, मात्र पाणी नाही आले' ! याची चर्चा दुष्काळी भागात होत आहे. 

टँकरच्या पाण्यावर ग्रामस्थांना भागवावी लागते तहान
काकडी विमानतळा सभोवताली असणाऱ्यागावांमध्ये सध्या भीषण दुष्काळी स्थिती आहे. अनेक गावांमध्ये अक्षरशा टँकरच्या पाण्यावर ग्रामस्थांना तहान भागवावी लागते. त्यामुळे विमान येवून सर्वसामान्य जनतेला काय उपयोग झाला ? असा प्रश्न विचारला जात आहे. 

''विमानाने येणारे साईभक्त विमानतळावर उतरल्यावर हायफाय गाडयांमधून प्रवास करतात व दर्शन घेवून निघून जातात. 'विमान आले, मात्र पाणी आले नाही'. विमानतळाचा शेतकरी व सर्व सामान्यांना काही उपयोग नाही. पाणीप्रश्नी उपाययोजना होणे गरजेचे आहे.''
- सुरेश कांडेकर , युवक कार्यकर्ता, डांगेवाडी 

----------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aircraft came, but there is no water