Vidhan Sabha 2019 युतीच्या विरुद्ध ' माण 'चा सर्वपक्षीय उमेदवार ठरला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे, डॉ. दिलीप येळगावकर यांनी उमेदवाराच्या नावाची घोषणा केली.

सातारा : माण विधानसभा मतदारसंघातील "आमचं ठरलंय' या सर्वपक्षीय आघाडीचा आज उमेदवार निश्‍चित झाला. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांचे नाव सर्वानुमते जाहीर करण्यात आले. या संदर्भात साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे, डॉ. दिलीप येळगावकर यांनी याबाबतची घोषणा केली. त्यामुळे देसाई हे युतीच्या उमेदवाराविरोधात लढतील. 

माण मतदारसंघात आमदार जयकुमार गोरे हटावचा नारा देत "आमचं ठरलंय' या नावाने सर्वपक्षीय आघाडीची स्थापना केली होती. या आघाडीत भाजपचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, अनिल देसाई, राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे, माजी सनदी अधिकारी व राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, शिवसेनेचे नेते रणजितसिंह देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, जिल्हा बॅंकेचे संचालक अर्जुनराव खाडे सहभागी झाले होते. आमदार जयकुमार गोरेंविरोधात सर्वपक्षीय आघाडीने एक उमेदवार देण्याचे ठरविले होते. मात्र, एकाच्या नावावर एकमत होण्यास वेळ लागला.

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली तरी एकमत होत नव्हते. हे सर्वजण युतीचा उमेदवार कोण असेल, यासाठी थांबले होते. मात्र, माणच्या जागेवरच शिवसेना व भाजप अडून बसले होते. त्यामुळे आज आघाडीतील नेत्यांनी एकत्र बसून अनिल देसाईंच्या नावावर शिक्कामोर्तब केले. 

या संदर्भात भूमिका मांडताना डॉ. येळगावकर म्हणाले, ""आमच्या आघाडीत कोणा एकाच्या नावावर एकमत होण्यास थोडा वेळ लागला. थोडी घासूनपुसून चर्चा होऊन आज अखेर आम्ही निर्णय घेतला.''
प्रभाकर घार्गे म्हणाले, ""तीन-चार दिवसांपासून आम्ही एकमेकांची मते आजमावत होतो. आम्ही सर्व जण इच्छुक होतो. पण, आमच्यात एकमत होत नव्हते. खूप चर्चा झाल्यानंतर आम्ही देसाईंची उमेदवारी जाहीर केली आहे.'' आघाडीतून राष्ट्रवादीने येथून तुम्हाला उमेदवारी जाहीर केल्यास तुम्ही लढणार का, यावर ते म्हणाले, ""हा मतदारसंघ आघाडीच्या जागा वाटपात कॉंग्रेसकडे होता. पण, आता त्यांच्याकडे उमेदवारच नाही. त्यामुळे आम्ही सर्वांनी एकत्र येताना राष्ट्रवादीतील कोणीही या मतदारसंघातून पक्षाकडून तिकीट घेणार नाही, असे ठरविले आहे.'' 

सर्वांच्या एकमताने माझे नाव निश्‍चित झाले आहे. आता आमची लढाई युतीच्या उमेदवाराविरोधात असेल. मी भाजपचा पदाधिकारी असलो तरी पक्षाच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढणार आहे. प्रसंगी पदाचा राजीनामा द्यावा लागला तरीही मागे-पुढे पाहणार नाही. 

-अनिल देसाई, उमेदवार, आमचं ठरलंय आघाडी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All party decided their Candidate against the alliance in Man taluka