कोरोना आला गावात कारभारी मात्र बिनधास्त?; वाचा काय झाले? 

भाऊसाहेब मोहिते
Sunday, 12 July 2020

व्यंकोचीवाडी-एरंडोली येथे कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर गावात सावधगिरी बाळगण्याची गरज होती. मात्र, शनिवारच्या आठवडा बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ण फज्जा उडाला.

एरंडोली (जि. सांगली) : व्यंकोचीवाडी-एरंडोली येथे कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर गावात सावधगिरी बाळगण्याची गरज होती. मात्र, शनिवारच्या आठवडा बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ण फज्जा उडाला आहे. गाव कारभाऱ्यांना कोणतेही गांभीर्य नाही, असेच चित्र येथे होते. 

सुरुवातीच्या काळात गाव कारभाऱ्यांनी गावात आपत्ती व्यवस्थापन समितीची स्थापना करून विनामास्क फिरणारे, चोरून दारू, मावा, गुटका विकणारे यांच्यावर जरब बसवली होती. मात्र, गेल्या महिन्यापासून आपत्ती व्यवस्थापन समितीचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. चार दिवसांपूर्वी मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचार घेणारा व्यंकोचीवाडी एरंडोली येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्याने आरोग्य विभागामार्फत सर्व उपाययोजना सुरू आहेत. मात्र, गावात आज भरवलेल्या आठवडा बाजारात "ना सोशल डिस्टन्स, ना सुरक्षा' अशी स्थिती होती. त्यामुळे येथील रुग्णांत वाढ होणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

सध्या पूर्व भागातील व्यंकोचीवाडी, शिंदेवाडी, बेळंकी येथे कोरोनाचे रुग्ण सापडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे व संसर्ग होऊ नये यासाठी उपाययोजना सुरू आहेत. गावातील व्यवहार ठप्प झाले आहेत. मात्र, व्यंकोचीवाडी येथे संपूर्ण गावच कंटेन्मेंट झोनमध्ये असूनही औषध फवारणी व्यतिरिक्त सॅनिटायझर व मास्क वाटप अद्याप झाले नाही. याबाबत ग्रामपंचायतकडे वारंवार मागणी करूनही त्याकडे लक्ष दिले गेले नाही. 

सॅनिटायझर, मास्कचे वाटप करावे
कंटेन्मेंट झोनमधील स्वयंसेवक व नागरिकांना अद्याप ग्रामपंचायतीकडून सॅनिटायझर व मास्कचे वाटप झाले नाही. ते त्वरित करावे. 
- सुभाष साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते, व्यंकोचीवाडी 

संपादन - युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: all people gather together for weekly market; even corona enters in erandoli villege