मिरज हायस्कूलसाठी पुन्हा मोर्चेबांधणी; सर्वपक्षीय कार्यकर्ते-नागरिकांचा पुढाकार

प्रमोद जेरे
Monday, 21 September 2020

मिरज हायस्कूलचे क्रिडांगण व्यापाऱ्यांच्या घशात घालण्यासाठी आतुर झालेल्या महापालिकेतील कारभाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी पुन्हा एकदा हायस्कूल बचाव कृती समिती सरसावली आहे.

मिरज (जि. सांगली) : मिरज हायस्कूलचे क्रिडांगण व्यापाऱ्यांच्या घशात घालण्यासाठी आतुर झालेल्या महापालिकेतील कारभाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी पुन्हा एकदा हायस्कूल बचाव कृती समिती सरसावली आहे. सर्वपक्षीय कार्यकर्ते, माजी विद्यार्थी आणि प्रतिष्ठित मंडळीनी याप्रसंगी रस्त्यावरील आणि न्यायालयीन लढाईची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. प्रशासनप्रमुख म्हणून आयुक्त आणि महापालिकेतील कारभाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला. 

नगरसेवक योगेंद्र थोरात, अभिजीत भोसले, डॉ.महेशकुमार कांबळे, शहर सुधार समितीचे ए. ए. काझी, मिरज बचाव कृती समितीचे ऍड. श्रीकृष्ण पोतकुळे, तानाजी रुईकर, सुनील मोरे,तांदूळ मार्केट व्यापारी संघटनेचे विवेक उर्फ बंडू शेटे, मिरज हायस्कूल बचाव कृती समितीचे जहीर मुजावर, चंद्रकांत आंबी, माजी विद्यार्थी संघटनेचे ओंकार शुक्‍ल, डॉ. प्रशांत लोखंडे, मनोहर कुरणे, आसिफ मालगावे, गणेश तोडकर विनायक रुईकर, सतीश आगळगावे आदींनी या कामी पुढाकार घेतला.

1976 मध्ये सांगली शिक्षण संस्थेकडून तत्कालीन मिरज नगरपालिकेकडे हस्तांतरित झालेल्या या हायस्कूलच्या हस्तांतरणावेळीच हायस्कूलच्या जागेचा वापर क्रिडांगणाशिवाय अन्य कोणत्याही उद्देशासाठी करावयाचा नाही असे करारामध्ये स्पष्ट नमूद केले आहे तरीही त्याचा भंग करून उपमहापौर आनंदा देवमाने यांनी ही जागा व्यापाऱ्यांना देण्यासाठी नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय "मिरज पॅटर्न'ला शोभेल अशा पद्धतीने आयत्या वेळच्या ठरावात घुसवला आणि महापालिकेतील शिस्तबद्ध म्हणवणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या महापौरांनी घाईगडबडीत ठराव वाचनाची तसदीही न घेता मंजूर केला. याबद्दल संतापाची भावना आहे. 

मुख्याध्यापक राजी? 
जागा विक्रीसाठी प्रशासनातील अनेकांचा हात असल्याची शहरात चर्चा आहे. हायस्कुलच्या मुख्याध्यापक नियुक्ती प्रकरणाच्या चौकशीची गरज कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. या संपुर्ण प्रकरणात सहभागींच्या पापाचा पाढा मिरजकरांसमोर मांडण्यात येणार आहे.

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All united to save Miraj High School again; All-party activist-citizen initiative