सुपारी घेऊन जागांचे विषय महासभेत... यांचा आरोप

municipal corporation.jpg
municipal corporation.jpg

सांगली-  महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाशी संगनमत करून नुकसान भरपाईचे विषय महासभेसमोर आणले आहेत. सभेत आरक्षित जागांना नुकसान भरपाई देण्याचा विषय आहे. मात्र या जागांची मुदत संपण्याच्या मार्गावर असताना सत्ताधाऱ्यांनी सुपारी घेऊनच हे विषय महासभेसमोर आणले असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते उत्तम साखळकर, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी पत्रकार बैठकीत बोलताना केला. आरक्षण बाधित जमीनधारकाना एआर किंवा टीडीआर द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. 

महापालिकेची उद्या (गुरुवारी) ऑनलाईन महासभा होणार आहे. यामध्ये महापालिकेने आरक्षित केलेल्या जागांना भरपाई देण्याचे विषय आणले आहेत. याबाबत आज कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांची एकत्रित बैठक झाली. यामध्ये जागांच्या विषयांना विरोध करण्याचे ठरले. त्यामुळे महासभेत विरोधक आक्रमक होण्याची शक्‍यता आहे. 
साखळकर म्हणाले,"" ऑनलाइन पद्धतीने महासभा होणार आहे. प्रशासनाने आरक्षणाने बाधित होणाऱ्या जागा मालकांना नुकसान भरपाई देण्याचे विषय सभेसमोर ठेवले आहेत. तब्बल साडे तीन कोटींचे हे प्रस्ताव आहेत. काही जागांचे आरक्षण आपोआप उठले असताना त्याच्या नुकसान भरपाईचे विषय आणले आहेत.

मिरज येथील सि.स.नं. 834 आरक्षणाने बाधित होणाऱ्या जागा मालकास 33 लाख 77 हजार 500 रुपये नुकसान भरपाई देण्याचा विषय तब्बल सात महिन्यांनी प्रशासनाने सभेसमोर आणला आहे. सुपारी घेऊन विषय पारदर्शक कारभाराचा डांगोरा पिटणाऱ्या सत्ताधाऱ्यांना हाताशी धरुन प्रशासनाने संगनमताने हे विषय आणले आहेत.'' 
ते म्हणाले,"" नुकसान भरपाई देण्याच्या विषयातील काही विषयांची मुदत शुक्रवार 17 जुलैला संपणार आहे आणि त्याच्या आदल्या दिवशी महासभा आहे. म्हणजे हा सगळा कारभार सुपारी घेऊनच सुरू आहे. त्याला आमचा विरोध आहे.'' 

अजिंकियन फौंडेशन कोणाचे? 
दक्षिण शिवाजी नगर येथील सि.स.नं. 12404 मधील खुली जागा आणि इमारत विकसित करण्यासाठी अजिंकियन फौंडेशनला 29 वर्षासाठी भाड्याने देण्याचा विषयही मान्यतेसाठी महासभेसमोर ठेवला आहे. साखळकर म्हणाले, ही संस्था कोणाची आहे, संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत याबाबत विषय पत्रात काहीही माहिती दिलेली नाही. संस्थेची नोंदणी नाही. एका साध्या कागदावर संस्थेने महापालिकेकडे अर्ज केला आहे. संस्था भाडे किती देणार हे स्पष्ट होत नाही असे असताना मालमत्ता विभागाने हा विषय महासभेसमोर आणला आहे. त्याला सभेत विरोध करू. 

संपादन : घनशाम नवाथे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com