बाळासाहेब ठाकरे कृषी महाविद्यालय स्थापण्यास मान्यता द्या 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019

करमाळा तालुक्‍यातील शेलगाव (वा.) येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी आपण आमदार असताना वारंवार महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद यांच्याकडे मागणी केली आहे.

जेऊर (जि. सोलापूर) : करमाळा तालुक्‍यातील शेलगाव (वा.) येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असल्याची माहिती माजी आमदार नारायण पाटील यांनी दिली. माजी आमपदार पाटील यांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन मुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या व तालुक्‍यातील विविध प्रलंबित प्रश्‍न सोडवण्यासाठी मागण्यांचे निवेदन दिले. 

हेही वाचा : तो चिमणी बनून आगीवर नियंत्रण मिळवत राहिला 
माविद्यालयासाठी जमीन उपलब्ध 

याबाबत माजी अमदार पाटील म्हणाले, करमाळा तालुक्‍यातील शेलगाव (वा.) येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी आपण आमदार असताना वारंवार महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद यांच्याकडे मागणी केली आहे. या संदर्भात वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांची शेलगाव (वा.) या ठिकाणी जमीनही उपलब्ध आहे. तसेच जवळच उजनीचे पाणी उपलब्ध आहे. करमाळा मतदारसंघातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती असल्याने कृषी महाविद्यालय होणे गरजेचे आहे. त्यामुळे नवनवीन संशोधन व शेतीचा विकास होण्यास मदत होणार आहे. या भागातील विद्यार्थ्यांना येथे कृषी शिक्षण घेता येणार आहे. शेलगाव येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने कृषी महाविद्यालय व्हावे, असा प्रस्ताव शासन दरबारी दाखल केला असून यास मान्यता मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

हेही वाचा : उजनी धरणात गुदमरतोय माशांचा जीव 
तालुक्‍यला पाणी मिळावे 

नागपूर येथे हिवाळी आधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन करमाळा तालुक्‍याला कुकडीचे हक्काचे साडेपाच टीएमसी पाणी उजनीत देऊन ते उचल पाण्याच्या स्वरूपात मांगी तलावात व करमाळ्याच्या उत्तर भागाला मिळावे, मराठवाड्याला जाणाऱ्या बोगद्यातून तालुक्‍यातील शेतकऱ्यांना दोन टीएमसी पाणी मिळावे अशा मागण्या केल्या. 
- नारायण पाटील, माजी आमदार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Allow Balasaheb Thackeray Agricultural College to be established