सांगली "आरटीओ' कार्यालयात रुग्णवाहिका नियंत्रण कक्ष; रुग्णवाहिकांचे दर निश्‍चित 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 30 August 2020

नियंत्रण कक्ष क्रमांक - (0233) 2310555 

सांगली ः येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात रुग्णवाहिका नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. चोवीस तास ही सेवा सुरू राहणार असून रुग्णवाहिकांचे दरही निश्‍चित करण्यात आले आहेत, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी दिली. 

महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यात रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दिवसाला पाचशेच्या पटीत रुग्ण आढळून येत आहेत. अशा परिस्थितीत रुग्णांना रुग्णालयात पोहचविण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नाहीत. शिवाय खासगी रुग्णवाहिका चालकांकडून दुप्पट भाडे आकारणी केली जात आहे. यामुळेच जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या सूचनेप्रमाणे रुग्णवाहिका नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. 

श्री. कांबळे म्हणाले,""कोरोनाबाधिक रुग्णांना रुग्णालयात वेळेत पोहचवण्यासाठी हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. चोवीस तास हा कक्ष सांगलीकरांच्या सेवेत असेल. खासगी मालकीच्या नोंदणी असलेल्या रुग्णवाहिकांना यात समावेश करून घेण्यात आले आहे. रुग्णवाहिकेची मागणी केल्यानंतर चालकाचे नाव, रुग्णवाहिका क्रमांक, मोबाईल क्रमांक दिला जाईल. रुग्णवाहिकेचे दर निश्‍चित करण्यात आले आहेत. त्यापेक्षा अधिक भाड्याची मागणी केल्यास तक्रार करावी. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. जादा भाडे घेणाऱ्यांवर कावाई केली जाईल.'' 

नियंत्रण कक्ष क्रमांक (0233) 2310555 

 

भाडे आकारणी अशी 
25 किलोमीटर किंवा 2 तासासाठी मारूती व्हॅन 550 रुपये, टाटा सुमो, इको 700 रुपये, टेंम्पो ट्रॅव्हलर 900 रुपये, तर आयसीयु रुग्णवाहिकीचे 1200 रुपये दर असतील. लांब जाण्यासाठी प्रति किलोमीटर भाडे निश्‍चित करण्यात आले आहे. मारूती व्हॅन 11 रुपये, टाटा सुमो, इको 14 रुपये, टेंम्पो ट्रॅव्हलर 18 रुपये, आयसीयु रुग्णवाहिका 24 रुपये दर असतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ambulance control room at RTO office; fixed rates for ambulances