शासनाची रुग्णवाहिका ठरतेय जीवदायी ; आतापर्यंत 42 लाख रुग्णांना जीवदान

तानाजी पवार
मंगळवार, 3 सप्टेंबर 2019

त्याशिवाय शासनाची रुग्णवाहिका म्हणजे चाकावरचे प्रसूतिगृहही ठरली आहे.

वहागाव  ः रुग्णवाहिका म्हटलं की मोठा आधार असतो. तो आधार बनण्याचे काम शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील रुग्णवाहिकेने केले आहे. अपघातासह आपत्कालीन स्थितीमध्ये रुग्णांना मोफत व जलद वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी सुरू झालेली शासनाच्या "108' या रुग्णवाहिका राज्यातील लाखो लोकांना जीवनदान देणारी ठरली आहे. पूरग्रस्त स्थितीतही रुग्णवाहिकांमुळे शेकडो नागरिकांना मोलाची मदत झाली. 2014 पासून राज्यात सुरू असलेल्या 937 रुग्णवाहिकांमुळे आजअखेर 42 लाख 44 हजार 222 रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. 
राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये जखमी झालेल्या रुग्णांना मोफत व जलद वैद्यकीय मदत मिळावी यासाठी 2014 मध्ये "108' रुग्णवाहिकेची सेवा सुरू केली. आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय उपचारासाठी सुरू करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेत सुमारे 33 हजार बाळंतपण सुखरुपपणे झाली आहेत. ऑगस्ट महिन्यात सातारा, सांगलीसह, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातही या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून हजारो नागरिकांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यासाठी मोलाची मदत झाली. 2014 पासून ते जुलै 2019 पर्यंत सुमारे तीन लाख 46 हजार रस्ते अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे काम या रुग्णवाहिकेमुळे शक्‍य झाले आहे. अपघातग्रस्तांना लगेचच आवश्‍यक प्राथमिक उपचार मिळाल्याने अनेकांचे प्राण वाचले आहेत. आतापर्यंत विविध 13 प्रकारच्या वैद्यकीय आपत्कालीन स्थितीतील रुग्णांना वेळेत उपचार मिळाले आहेत. रस्ता अपघात, नैसर्गिक आपत्ती, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला "गोल्डन अवर'मध्ये उपचार मिळण्यासाठी अत्याधुनिक रुग्णवाहिकेची ही सेवा रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. या सेवेंतर्गत राज्यात 937 रुग्णवाहिका सुरू आहेत. दोन वर्षांपूर्वी राज्यात मुंबईमध्ये बाईक ऍम्ब्युलन्स सुरू झाल्या आहेत. त्यातून आतापर्यंत 22 हजार रुग्णांना सेवा देण्यात आली आहे. सेवेचा विस्तार करत मुंबईमध्ये 18, पालघर, अमरावतीत प्रत्येकी पाच, तर सोलापूर आणि गडचिरोलीमध्ये प्रत्येकी एक अशा 30 बाईक ऍम्ब्युलन्स सध्या कार्यरत आहेत. 

चाकावरचे प्रसूतिगृह 
रुग्णवाहिका आली की, अनेकांचे प्राण वाचतात, अशी लोकांची धारणा आहे. ती शासनाच्या रुग्णवाहिकेने खरी ठरवली आहे. त्याशिवाय शासनाची रुग्णवाहिका म्हणजे चाकावरचे प्रसूतिगृहही ठरली आहे. पाच वर्षांत सुमारे 33 हजार गर्भवतींचे सुखरुप बाळंतपण करण्यात आले आहे. त्यामुळे खेड्यापाड्यांसह शहर आणि दुर्गम ठिकाणी बाळांतपणात गरज असलेल्या अनेक महिलांसाठी रुग्णवाहिका वरदान ठरली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The ambulance of the government saved 42 lakh lives