महासभेत रद्द केलेल्या ठरावात दुरुस्ती...मिरज हायस्कूलच्या आवारातील गाळ्यांची जागा वाढवण्यास मंजुरी 

बलराज पवार
Friday, 18 September 2020

सांगली-  मिरज हायस्कूलच्या आवारातील अण्णा बुवा शॉपिंग कॉम्प्लेक्‍समधील गाळेधारकांना जागा वाढवून देण्याचा ठराव जानेवारीत झालेल्या महासभेत रद्द करण्यात आला होता. मात्र तो आजच्या महासभेत 1 (ज) खाली आणून रद्द केलेल्या ठरावात दुरुस्ती करुन मंजूर करण्यात आला. 

सांगली-  मिरज हायस्कूलच्या आवारातील अण्णा बुवा शॉपिंग कॉम्प्लेक्‍समधील गाळेधारकांना जागा वाढवून देण्याचा ठराव जानेवारीत झालेल्या महासभेत रद्द करण्यात आला होता. मात्र तो आजच्या महासभेत 1 (ज) खाली आणून रद्द केलेल्या ठरावात दुरुस्ती करुन मंजूर करण्यात आला. 

महापालिकेच्या आज झालेल्या ऑनलाईन महासभेत 1 (ज) खाली तीन विषय होते. स्थायी समितीच्या आठ सदस्यांची निवड जाहीर केल्यानंतर महापौर सौ. गीता सुतार यांनी 1 (ज) खालचे विषय मंजूर केल्याचे सांगत सभा संपल्याचे जाहीर केले. त्यामुळे हे सर्व विषय मंजूर झाले. यातच उपमहापौर आनंदा देवमाने यांनी दिलेला अण्णा बुवा शॉपिंग कॉम्प्लेक्‍समधील गाळे धारकांना जागा वाढवून देण्याचा विषयही होता. 

मिरज हायस्कूलच्या आवारात असलेल्या अण्णा बुवा शॉपिंग कॉम्प्लेक्‍समधील गाळे धारकांना त्यांच्या गाळ्याची जागा वाढवून देण्याचा प्रस्ताव 21 नोव्हेंबर 2019च्या महासभेत आला होता. तो ठराव 20 जानेवारी 2020 च्या महासभेसमोर कायम करण्यासाठी आला. मात्र त्याला कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांच्यासह नगरसेवक अभिजित भोसले, मंगेश चव्हाण, प्रकाश मुळके आदींनी गाळ्यांना जागा वाढवून देणे म्हणजे शासनाने घालून दिलेल्या नियमाचा भंग असल्याचे सांगत विरोध केला होता. तत्कालीन महापौर संगीता खोत यांनी हा ठराव रद्द करुन कायदेशीर बाबी तपासून पुन्हा नवीन प्रस्ताव आणावा असे स्पष्ट केले होते. मात्र तसे न करता आजच्या सभेत 1 (ज) खाली प्रस्ताव आणला. 

उपमहापौर देवमाने यांनी आणलेल्या या प्रस्तावात, अण्णा बुवा शॉपिंग कॉम्प्लेक्‍समधील गाळेधारकांची जागा वाढवून देण्याची मागणी वारंवार होत आहे. सदर गाळेधारक गेली अनेक वर्ष या ठिकाणी व्यवसाय करत आहेत. त्यांच्या मागणीचा विचार करता व महापालिकेच्या उत्पन्नवाढीचा विचार करता रद्द केलेल्या ठरावात दुरुस्ती करुन 20 नोव्हेंबर 2019च्या ठरावाप्रमाणे गाळेधारकांना जागा वाढवून देण्याबाबत निर्णय घ्यावा असे म्हटले होते. 
या प्रस्तावावर चर्चा अपेक्षित होती. मात्र महापौरांनी 1 (ज) खालील विषय मंजूर केल्याचे जाहीर केल्याने त्यावर चर्चाच होऊ शकली नाही. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर झाला. 

सत्ताधाऱ्यांनी आपल्याच महापौरांनी एकदा रद्द केलेला ठराव पुन्हा 1(ज) खाली आणून चर्चेविना मंजूर केला आहे. त्यावेळी पारदर्शक कारभाराबद्दल स्वत:ची पाठ थोपटून घेणारे सत्ताधारी आता कुठल्या तोंडाने आपली पाठ थोपटून घेणार. 
- नगरसेवक अभिजित भोसले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amendment in the resolution canceled in the general meeting