यशवंतरावांच्या भूमीत अमित शहांचे शरद पवारांना चॅलेंज

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 October 2019

भाजपचे कऱ्हाड दक्षिणचे उमेदवार अतुल भोसले व लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कऱ्हाडला झालेल्या जाहीर सभेत श्री. शहा बोलत होते.

सातारा : सिंचनासाठी 70 हजार कोटी रुपये खर्च केल्याचे अजित पवार सांगत आहेत. माझा शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांना प्रश्‍न आहे, की 70 हजार कोटी खर्च केले मग पाणी कुठे गेले, असा प्रश्‍न उपस्थित करून कृष्णा खोऱ्याची कामे कॉंग्रेसने पैसे खाऊन बंद पाडली. जवानांच्या सदनिका विकून कॉंग्रेसने पैसे खाल्ले. शरद पवारांना मी चॅलेंज करतो, आमचे मुख्यमंत्री व पंतप्रधानांवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप तुम्ही लावू शकत नाही, इतके ते प्रामाणिक आहेत, असा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लगावला. दरम्यान, अतुल भोसले यांना कऱ्हाडकरांनी एकदा आमदार बनवा, भाजप त्यांना महाराष्ट्राचा मोठा नेता बनवेल, असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.
 

भाजपचे कऱ्हाड दक्षिणचे उमेदवार अतुल भोसले व लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कऱ्हाडला झालेल्या जाहीर सभेत श्री. शहा बोलत होते. त्यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सडकून टीका केली. प्रारंभी उदयनराजे भोसले यांनी अमित शहा यांना रायगड किल्ल्याची प्रतिकृती तसेच तलवार भेट देऊन स्वागत केले. यावेळी उपस्थितांनी उदयनराजे, अतुलबाबा आणि मोदींच्या नावांच्या घोषणा दिल्या.
 

अमित शहा म्हणाले, सकाळपासूनच धुके असल्याने माझा दौरा दोन तास उशीरा होत आहे, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. साताऱ्याच्या या ऐतिहासिक भूमीत आल्याचा मला आनंद होत आहे. येथूनच छत्रपतींनी स्वराज्याचा संदेश देशभर पोचविला. छत्रपतींनी गुलामीच्या कालखंडाला तोडून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. या छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र भूमीला मी वंदन करतो. कोयना, कृष्णाकाठी वसलेल्या या कऱ्हाड नगरीला मी अभिवादन करतो. मला येथे अधिक बोलण्याची गरज नाही. अतुल भोसले म्हणतात की, मी लहान कार्यकर्ता आहे. पण, भारतीय जनता पक्षात कोणीही छोटा नाही, हा पक्षच कार्यकर्त्यांचा आहे. 

नेत्यांच्या मागे फिरून घोषणा देणारे व पोस्टर चिकटविणारे आता भाजपमध्ये नेते बनले आहेत. अशा महान पक्षाने मला अखिल भारतीय अध्यक्ष बनविले. देशाचा गृहमंत्री बनविले. बुथ अध्यक्षांपासून मी माझ्या राजकीय कार्याला सुरवात केली आहे. त्यामुळे अतुल भोसलेंनी स्वत:ला लहान समजू नये. तुम्ही कऱ्हाडकरांनी अतुल भोसले यांना विजयी करावे, हे सांगण्यासाठी मी आलो आहे. अतुल एकदा विधानसभा निवडणूक हरलेला आहे. त्यामुळे त्याला एकदा विजयी करून आमदार करा, भाजप त्यांना महाराष्ट्राचा सर्वात मोठा नेता बनवेल. 

आज आपल्या व्यासपीठावर उदयनराजे भोसले आहेत, याचा आनंद मला होत आहे. छत्रपतींच्या सिध्दांतावर आमचा पक्ष चालतो. देवेंद्र फडणवीस यांचा मला फोन आला. उदयनराजे भाजपमध्ये येत आहेत. मी त्यांना दिल्लीत आणा, माझ्या स्वत:च्या हाताने त्यांचा भाजप प्रवेश घेऊ अशी भावना व्यक्त केली. ते आता साताऱ्यातून निवडणूकीच्या रिंगणात आहेत. उदयनराजे व अतुल भोसले यांना बहुमतांनी विजयी करा असे ही शहांनी नमूद केले. 

ते म्हणाले, ही यशवंतराव चव्हाणांची भूमी आहे. कॉंग्रेसच्या लोकांना मी सांगतो, तुम्ही कधीही नेत्यांचा सन्मान केला नाही. यशवंतराव यांचाही कॉंग्रेसने सन्मान केला नव्हता. देवेंद्रजी यांचा पुन्हा मुख्यमंत्री म्हणून शपथ विधी झाला, तर कऱ्हाडच्या पुराच्या सर्व समस्या दूर केल्या जातील. भाजपने या भागाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात कामे आणली आहेत. पाच वर्षात सातारा जिल्हा 48 हजार हेक्‍टर सिंचनाखाली आणला तसेच सिंचनासाठी 70 हजार कोटी रूपये खर्च केल्याचा दावा अजितदादांचा आहे. माझा शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांना प्रश्‍न आहे, की 70 हजार कोटी रूपये खर्च केले मग पाणी कुठे गेले ?

कृष्णा खोऱ्याची कामे 15 वर्षांपासून बंद होती, भाजपचे सरकार आले आणि या कामांना सुरवात झाली. कृष्णा खोऱ्याची कामे कॉंग्रेसने पैसे खाऊन बंद पाडली. हीच कामे आता भाजपचे सरकार पूर्ण करणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 34 प्रकल्पांना 15 लाख कोटी रुपये केंद्राच्या मदतीने देऊन ही कामे सुरू केली आहेत. गेली दहा वर्षे केंद्रात आघाडी सरकार होते. शरद पवारांना मी विचारतो, आपण महाराष्ट्रासाठी काय केले ?, पृथ्वीराज चव्हाण तुमच्याकडे मते मागण्यासाठी आले तर विचारा केंद्रात काम करत होता मग हा भाग विकासापासून वंचित का राहिला. एका बाजूला आघाडीची 15 वर्षे आणि दुसऱ्या बाजूला भाजपची पाच वर्षे अशी तुलना केल्यास आमच्या पक्षाने मोठ्या प्रमाणात कामे केल्याचे दिसून येईल.
 
कॉंग्रेसने तर जवानांच्या सदनिका विकून पैसे खाल्ले. शरद पवारांना मी चॅलेंज देतो, आमच्या मुख्यमंत्री व पंतप्रधानांवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप लागू शकत नाही, इतके ते प्रामाणिक आहेत. तसेच 370 कलमाचा महाराष्ट्राशी काय संबंध, असे श्री. पवार विचारतात. पण, तुम्ही काश्‍मीर आपण आपला अविभाज्य भाग मानतो, मग यांना शरम वाटली पाहिजे, काश्‍मीरशी काय संबंध आहे, असे म्हणायला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Shah's challenge to Sharad Pawar